धक्कादायक! वन्यजीवांची देखभाल हंगामी कामगारांच्या हाती; बदनामीच्या गर्तेतील वन खात्याची लक्तरे टांगली वेशीला

वन्यजीवांची सोलापूर वन विभागाकडून हेळसांड होत आहे. हे उपचार केंद्र स्थापन झाल्यापासून आजपर्यंत किती वन्यजीव दाखल झाले? किती वन्यजीवांवर उपचार करण्यात आले? किती वन्यजीव मृत्युमुखी पडले? किती उपचार घेऊन पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे.
wildlife
wildlifesakal
Updated on

सोलापूर : ‘गेला धनेश कुणीकडे?’ अशी हाक देत पर्यावरण दिनीच पक्षीप्रेमींनी केलेल्या लाक्षणिक उपोषणामुळे वन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी मोर व धनेश या सूची एकमधील पक्षांसंदर्भात तब्बल वर्ष उलटूनही कारवाईबाबत जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यावेळी संताप व्यक्त झाला. याबरोबरच या विभागाच्या अखत्यारितील वन्यजीवांवरील उपचार व हंगामी कामगारांच्या धुमाकुळीबाबत या खात्याची लक्तरे वेशीस टांगली गेली, यावर फोकस टाकण्यात आला.

‘नाच रे मोरा नाच पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानात!‘ या मथळ्याखाली भूमिका सदरातून कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात जानेवारी २०२२ मध्ये आढळलेल्या जखमी मोराला ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याबाबत ऊहापोह करण्यात आला होता. उपचाराचे अधिकार केवळ वन विभागाकडे असताना हे कृत्य एका जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाले. वन विभागाने या संदर्भातील कारवाईबाबत चुप्पी साधली आहे. पक्ष्यांवरील उपचाराचा हेतू उदात्त असला तरी अधिकार नसताना केलेल्या कृत्याबाबत सखेदाश्‍चर्य व्यक्त होत होते. एकीकडे हा गंभीर प्रकार असताना दुसरीकडे सिद्धेश्‍वर वनविहारातील वन्यजीव उपचार केंद्राबरोबरच हंगामी कामगारांच्या कृतीबाबत सारे काही ‘आलबेल' असल्याचे जाणवत आहे.

वन्यजीवांवरील उपचार अन्‌ इतर बाबी संशोधनाचाच विषय

सोलापूर उप- वनसंरक्षकांच्या नियंत्रणाखाली रोजगार हमी योजनेच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील सिद्धेश्वर वनविहार येथे वन्यजीव उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात शहर-जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षामध्ये संकटात सापडलेले वन्यजीव, वन्यजीव प्रेमी, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि वन कर्मचाऱ्यांमार्फत बचाव करून त्यांच्यावर उपचार होईल, देखभाल होईल या अपेक्षेने दाखल केले जातात.

अशाप्रकारे दाखल वन्यजीवांची सोलापूर वन विभागाकडून योग्य उपचाराविना आणि देखभालीविना हेळसांड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे उपचार केंद्र स्थापन झाल्यापासून आजपर्यंत किती वन्यजीव दाखल झाले? किती वन्यजीवांवर कोणाकडून व काय उपचार करण्यात आले? किती वन्यजीव मृत्युमुखी पडले? आणि किती उपचार घेऊन पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे.

वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी, ॲनिमल कीपर आणि योग्य प्रशिक्षण आणि माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांअभावी या उपचार केंद्रात दाखल अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. वन्यजीव उपचार केंद्रातील मृत्यू झालेल्या वन्यजीवांची विहितरीतीने उपचार केंद्रातच सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी न करता केवळ कागदोपत्री अहवाल तयार होत असल्याचा आरोप होत आहे. हैदराबाद रोड येथील जिल्हा पशुवैद्यकीय उपचार केंद्र येथे उत्तरीय तपासणी केली जात असल्याचीही माहिती हाती आली आहे. वन विभागाच्या उपचार केंद्रात मृत्यू पावलेल्या अनेक वन्यजीवांचे उत्तरीय तपासणी अहवालच उपलब्ध नाहीत.

वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झालेल्या अनेक वन्यजीवांचा उत्तरीय तपासणी अहवाल उपलब्ध नसताना त्यांच्या परस्पर विल्हेवाट लावलेल्या नोंदी मात्र उपलब्ध आहेत. वन विभागाकडून आणि तेथील सक्षम अधिकाऱ्याकडून उपचार केंद्रात दाखल वन्यजीवांची केलेली हेळसांड ही अत्यंत दुर्दैवी आणि कायद्याचा भंग करणारी आहे. स्वयंसेवक, प्राणीप्रेमी आणि अशासकीय संस्थांचे सदस्य स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या वन्यजीवांना वाचवतात आणि त्यांच्या देखभाल आणि उपचारासाठी वन विभागाकडे सुपूर्द करतात. परंतु, वन अधिकाऱ्यांची अक्षम्य हयगय आणि त्यांच्या अनास्थेमुळे वन्यजीवांची होणारी हेळसांड यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये नाराजी पसरल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वन विभागाच्या या सगळ्या त्रुटी असतानाच वन्यजीव उपचार केंद्र वन कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक असलेल्या हंगामी मजुरांनी भरलेला आहे. किती हंगामी मजूर प्रत्यक्ष कामावर आहेत? आणि त्यातील कितीजणांना वन्यजीवांबद्दल माहिती आणि त्यांना हाताळण्याचे कौशल्य अवगत आहे? हे नियुक्त करणारे अधिकारीच जाणो. वन्यजीव प्रेमींमध्ये या कृतीच्या विरोधाचे सूर जाणवताच वन कर्मचाऱ्यांसह हंगामी मजुरांना प्राणीप्रेमी दाखवून पुण्यामध्ये प्रशिक्षणाला पाठवून तज्ज्ञ बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडून काढण्यात आलेल्या संचलनामध्ये वनविभागामार्फत सादरीकरण केलेले चित्ररथ चालवण्यासाठी एक हंगामी मजूर खाकी वर्दी घालून पाठवण्याचे धाडस वन विभागाने केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

समाज माध्यमांवर धुमाकूळ

सोलापुरातील वन्यजीव उपचार केंद्रात काम करणारे हंगामी मजूर तेथील आजारी वन्यजीवांबरोबर रील-व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केलेले, कुत्र्याप्रमाणे गळ्यात दोरी बांधून काळविटाला फिरायला घेऊन जाणे, इतकेच नव्हे तर कोणताही अधिकार नसताना राजचिन्ह असलेली खाकी वर्दी घालून वन कर्मचारी असल्याचे दाखवण्याची तोतयेगिरी करत असल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यापैकी एक हंगामी मजूर तर राजचिन्ह असलेली खाकी वर्दी घालूनच उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, शासकीय वाहन यांच्याबरोबर छायाचित्र काढून ‘बाप बाप आहे’ म्हणत समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत असल्याचे पुरावेच हाती लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.