वाघाची वाट काटेरी

राज्यातील राजकीय पेचप्रसंगातून सरकार जाणार की राहणार हा तातडीचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal
Updated on
Summary

राज्यातील राजकीय पेचप्रसंगातून सरकार जाणार की राहणार हा तातडीचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

शिवसेना ही वाघाची गुहा आहे तिथं जायची वाट आहे, परतायची नाही, असं कधीतरी सांगितलं जायचं, त्याला पहिला तडा नारायण राणे यांच्या बंडानंतर ‘रंगशारदा’बाहेर ज्या रीतीनं राणे समर्थक आणि शिवसैनिक भिडले त्यातून गेला. त्यानंतर राणे यांची कारकीर्द अनेक वळणं घेत सुरु राहिली, तरी शिवसेना विस्तारतच गेली. त्यामुळं याचा बहुतेकांना विसर पडला असेल, मात्र शिवसेनेतील बदलांचीही ती सुरवात होती. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर किमान ठाण्यात त्यांचा गट थेट आवाज टाकतो आहे. आक्रमकता कमी झाल्यानं शिवसेनेचा विस्तार थांबला नाही. उद्धव यांच्या तुलनेत नेमस्त नेतृत्वातही शिवसेना सत्तेत राहिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही वाटचाल अशीच चालणार की शिवसेनेला संपूर्ण रणनीती आणि लोकांसमोर मांडायचा अजेंडा त्यासाठीची शैली नव्यानं ठरवावी लागणार असं वळण आलं आहे.

राज्यातील राजकीय पेचप्रसंगातून सरकार जाणार की राहणार हा तातडीचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तसाच शिवसेनेचं भवितव्य काय, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील दीर्घकाळासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांनी, ‘आम्ही शिवसेनेचेच’ म्हणून टाकलेल्या पेचामागे त्यांचीच झालेली कोंडी हा एक भाग आहे. मात्र, त्यांनी हा आग्रह कायम ठेवल्यास एका बाजूला शिवसेनेला एका कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागेल, दुसरीकडं शिवसेनेचा खरा वाघ कोण हे जनतेच्या कौलावरच ठरणार असल्यानं हा पाठिंबा मिळवण्यात कोण यशस्वी होणार हा सर्वांत लक्षवेधी प्रश्‍न असेल. या आघाडीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपुढं बिकट वाट वाढून ठेवली आहे. राज्याच्या बहुतांश भागात मूळचा शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना मानतो, हा त्यांच्यासाठी दिलासा आहे. मात्र, शिवसैनिकांचाच, तुलनेत लहान का असेना, गट बंडखोरांसोबत आहे आणि त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व पातळ झाल्याचं वाटतं हा पक्षाच्या जनाधारातच फटका असेल.

अपूर्व पेच

एकनाथ शिंदे याच्या बंडानं शिवसनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अपूर्व असा पेच आणला आहे. शिवसेना कोणाची याविषयी शिंदे यांनी बंड करेपर्यंत शिवसेना ठाकरे यांचीच, यात शंकेचं कारण नव्हतं. ठाकरे यांच्यावर कोणी नाराज व्हावं, शिवसेनेत आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून वेगळी वाट धरावी किंवा शिवसेनेत सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्यांनंतरच्या कोणावरही आरोप करून संघटनेबाहरेचा रस्ता धरावा यात नवं काही नाही. अशा बंडांचा दीर्घ इतिहास आहे. शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेत भगदाड पाडलं. त्याचबरोबर आजवर कोणा बंडखोरानं जो दावा केला नाही, तो शिंदे गटानं केला. तो म्हणजे ‘शिवसेनाच आमची’, याचा अर्थ शिवसेना ठाकरेंची नाही. असा दावा करणं हेही मोठं धाडसच. याचं कारण ठाकरे या नावाखेरीज शिवसेनेची कल्पनाच कोणी केली नसेल. अगदी ठाकरे यांच्याच कुटुंबातील राज यांनी वेगळी वाट धरली, तेव्हाही शिवसेना माझी असं काही ते म्हणाले नव्हते. बाकी बंड करणारे भुजबळ, राणे आदींनी तसा दावा करण्याचा प्रश्‍नच नव्हता. अशा प्रत्येक बंडावेळी दृश्‍य स्वरुपात शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं दिसलंही होतं. बंड करणाऱ्यांच्यापैकी राणे यांचा किंचित अपवाद वगळता कोणाच्या बाजूनं शक्तिप्रदर्शनही झालं नव्हतं, जे झालं ते ठाकरे यांच्या बाजूनंच. शिंदे यांच्या गटानं आम्ही शिवसेनेतच आहोत, असं वारंवार सांगत याहून निराळा रस्ता धरण्याचा प्रयत्न केला आहे. जो शिंदे गटाला किती झेपणार हा प्रश्‍न आहेच. पण, मूळच्या शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षापुढंही आव्हानांची काटेरी वाट तयार करणारा आहे.

पक्ष काबीज करण्याची चाल

बंड करून अन्य पक्षात जाणं किंवा वेगळा गटच स्थापन करायचा प्रयत्न करून सरकार पाडणं, हे शक्‍यतेच्या कोटीतील असतं. मात्र मूळ पक्षच आमचा म्हणत ठाकरे घराण्याभोवतीच फिरणारा पक्ष काबीज करायची चाल शिंदे गट खेळतो आहे. या चालीला अनेक पदर आहेत ते शिंदे गटाच्या मागं असलेली त्यांच्या सांगण्यानुसारच्या महाशक्तीच्या म्हणजे ‘भाजप’च्या व्यूहनीतीचा भाग आहे. शिंदे यांना बंड यशस्वी करताना कायद्यानं ज्या मर्यादा आणल्या आहेत, त्यातून वाट काढायची आहे. तांत्रिक अडथळे दूर करायचे आहेत. त्यात मूळ शिवसेना आमचीच असा पवित्रा घेणं, हा सर्वांत सोयीचा मार्ग आहे. मात्र, उद्धव ठाकरे शिवसेनेवरचं नियंत्रण सोडण्याची शक्‍यता नाही. यातून एक दीर्घ तांत्रिक कायदेशीर लढाई साकारते आहे, जी अनेक पातळ्यांवर लढली जाईल. त्यात विधानसभेचे अध्यक्ष (ही जागा रिकामी असल्यानं उपाध्यक्ष), राज्यपाल, न्यायालय आणि निवडणूक आयोग अशा अनेक ठिकाणी दाव्यांची छाननी होईल. ठाकरे या ‘ब्रॅंड’भोवती चालणारा पक्ष असा ठाकरे घराण्याच्या हातून हिसकावता येईल का? असा हा मुद्दा आहे. त्याचा तांत्रिक कायदेशीर निकाल काहीही झाला तरी अंतिम फैसला जनतेच्या न्यायालयात होईल त्यात शिवसैनिक कोणाकडं हा कळीचा मुद्दा असेल आणि या आघाडीवर तूर्त तरी उद्धव ठाकरे यांचं पारडं जड आहे. राज्यभरातील मूळचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना मान्य करताहेत. त्यांना बंड मान्य नाही असा कल दिसतो आहे. त्याचबरोबर बंडखोरांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांविषयी शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांत चलबिचल नक्कीच दिसते आहे. आणि सर्वांत महत्त्वाचा कल दिसतो तो म्हणजे बंडखोरी शिवसैनिकांना रुचलेली नाही. मात्र, रस्त्यावर यासाठी आंदोलन करायची तयारी सर्वांची नाही. शिवसेनेचं स्वरूप बदलत असल्याचं हे लक्षण.

बदलत्या भूमिका

शिवसेनेनं पाच दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत एकच एक भूमिका कायम ठेवली असं अजिबात नाही कोणत्याही राजकीय पक्षाला तसं ते शक्‍यही नसतं. मात्र शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी अलीकडं अंमळ अधिकची चर्चा सुरु आहे. आणि त्यात शिवसेनेविषयीच्या बदलत्या भूमिका राजकारण किती वळणं घेऊ शकतं याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे देशाला हिंदुराष्ट्र घोषित करा असं सांगितलं होतं. तेंव्हा, शिवसेनेची मान्यता काढून घ्या, अशी मागणी काँग्रेसनं केली होती. ते ठाकरे विधिमंडळात ‘मी हिंदुत्ववादी’ म्हणून सांगताना काँग्रेसला खुपलं नाही, याचं कारण ते काहीही सांगत असतील, तरी त्यांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेशी तडजोड केली आहे, हे काँग्रेसला समजत होतं. आणि शिवसेनेला आपल्या राजकारणात त्याज्य समजणाऱ्या दोन्ही काँग्रेस पक्षांना किमान बोलताना का असेना हिंदुत्वाचा पुकारा करत राहणाऱ्या शिवसेनेसोबत तडजोड अनिवार्य वाटली. आता सरकार संकटात असताना शिवसेनेचेच आमदार गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत त्यांच्याकडून बाळाहेबांच्या हिंदुत्वाचा गजर रोज सुरु आहे. उद्धव त्यापासून बाजूला गेल्याच्या भाजपच्या ‘नॅरेटिव्ह’चा ते अप्रत्यक्षपणे पुरस्कार करताहेत आणि दोन्ही काँग्रेस उद्धव यांचं सरकार वाचावं यासाठी प्रयत्न करताहेत.

पुन्हा उजळणी

मराठी माणसासाठी लढणारी, सरकारी नोकरीतील परप्रांतीयांच्या याद्या प्रसिद्ध‌ करून मराठी जनांत संतापाचा अग्नी पेटविणारी संघटना ते राममंदिर आंदोलनानंतर अत्यंत स्पष्टपणे जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा, ‘हिंदू जना, हिंदू मना वाली, तुझी रे शिवसेना’, अशी स्टीकर काढणारा पक्ष... या वाटचालीत शिवसेनेनं अनेकदा वळणं घेतली आहेत. वैचारिकदृष्ट्या ती निरनिराळ्या ध्रुवावरची वाटावीत इतकी तीव्र होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या रुपानं पुन्हा त्या साऱ्याची उजळणी होते आहे. एकदा दोन्ही काँग्रेससोबत सत्तेत गेल्यानंतर हिंदुत्वाची तीच धार कायम राहिली आहे काय? किंवा कायम राहू शकते काय? या विषयीचा एक संभ्रम नक्कीच मधल्या काळात तयार झाला आहे. तसा तो तयार व्हावा यासाठी भाजप जमेल तितका प्रयत्न करणार हे उघड आहे. या सगळ्याचं एक वर्तुळ पुरं होत असताना आता शिवसेना नेमकी कोणती वाट स्वीकारणार, वैचारिक दिशा म्हणून, राजकीय कार्यक्रम म्हणून काय स्वीकारणार, यावर शिवसेनेची पुढची वाटचाल अवलंबून असेल. हेमचंद्र गुप्ते ते एकनाथ शिंदे अशा शिवसेनेतून जाणाऱ्या प्रत्येकानं काही ना काही कारणानं नाराजी दाखवली.

मात्र, अशा जाणाऱ्यांच्या मताची फिकीर सामान्य शिवसैनिकानं फारशी कधी केली नाही, किंबहुना तशी तो करणार नाही याची पक्की खबरदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी घेतली, म्हणूनच प्रत्येक फुटीवेळी आता शिवसेनेचं काय होणार? या चिंतेला पुरून उरत शिवसेना विस्तारतच राहिल्याचं दिसेल. यावेळी हा शिवसैनिकच एकसंघपणे मागं राहील काय? असा मुद्दा समोर येतो आहे. याचं कारण शिवसैनिक लक्षणीय प्रमाणात उद्धव यांच्यासोबतच राहील हे दिसत असलं तरी शिवसेनेतील एक प्रवाह बंडखोरांना सहानुभूती दाखवतो आहे, ती उघडपणे दाखवतो आहे. या पूर्वीच्या बंडावेळीही काही पडझड झाली, तरी शिवसेनेपुढं अस्तित्वाचा मुद्दा तयार झाला नाही. आता तो पक्षावरचं नियंत्रण कोणाचं विधिमंडळात कोणता गट शिवसेना म्हणवणार या तांत्रिक, कायदेशीर बाबींच्या रुपानं समोर आला आहे. तसाच जनतेच्या दरबारात कधीतरी जावंच लागेल तेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलेले भाजपच्या पाठिंब्यावर किती तगतील आणि त्यांच्यासोबत जो शिवसेनेच्या मतांचा वाटा बाहेर जाईल, तो किती फटका देईल यावर राजकीय पत ठरणार आहे. जमिनीवरून दिसणारा कल पाहता (ज्याचं प्रतिबिंब सकाळ माध्यम समूहानं केलेल्या फक्त शिवसैनिकांच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून दिसतं आहे) किमान एक प्रवाह उद्धव यांनी हिंदुत्वाशी तडजोड केल्याचं मानतो. हा प्रवाह शिवसेनेचा मतदार आहे. याच गटाला या कारणासाठी शिंदे यांचं बंड चुकीचं वाटत नाही, हे शिवसेनेसाठी चिंतेचं बनू शकतं. याचं कारण हा प्रवाह शिवसेनेच्या मतपेढीचा भाग आहे. राज्यातील मतांसाठीची स्पर्धा पाहता असा प्रवाह प्रत्यक्ष मतदानावेळीही दुरावला, तर शिवसैनिकांचा सर्वाधिक पाठिंबा असूनही जागांच्या हिशेबात फटका बसू शकतो.

पुढील भूमिका

मागच्या काही निवडणुकांतून शिवसेना धीमेपणानं आणि भाजपच्या तुलनेत गतीनं राज्यातील राजकीय वाटचाल करतो आहे. महाविकास आघाडी हे यातून तयार झालेल्या कोंडीत जमवलेलं समीकरण आहे. शिंदे यांचा गट स्वतंत्र पक्ष बनला किंवा एखाद्या पक्षाचा भाग बनला, तरी ती कोंडी तयार करणाऱ्या गणितांत मोठा बदल होऊ शकतो, तो शिंदे यांच्या साथीदारांच्या प्रत्यक्ष विजयात किती हातभार लावेल याविषयीची साशंकता कायम असली, तरी तो शिवसेनेला फटका देऊ शकतो. आणि इथंच शिवसेनेला पुढच्या वाटचालीची भूमिका ठरवावी लागेल. मराठी, हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, भाजपविरोध यातलं एक की कॉम्बिनेशन हे ठरवावं लागेल. आक्रमक रहायंच, व्हायचं की उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक प्रतिमा ठळक करत नवं राजकारण साकारायचं हे यातले प्रश्‍न आहेत. सर्वात महत्त्वाचं या सगळ्यांत शिवसैनिकांना आणि शिवसेनेला मतं देणाऱ्यांना सोबत कसं ठेवायचं ते जमेल त्याचा पक्ष.

उद्धव ठाकरे

२२ जून २०२२

शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही, म्हणूनच आदित्य ठाकरे अयोध्येला गेले.

  • हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री

  • शिवसेनेचे आमदार मी हिंदुत्वावर निवडून आणले.

२५ जून २०२२

  • भाजप हिंदुत्व फोडायला निघाले आहे. हे लोक हिंदुत्वाचे मारेकरी आहेत. शिवसेनेला देशाच्या राजकारणातून बाजूला काढा मग बघा काय होते.

  • १९९२ - १९९३ च्या दंगलीत हिरवे संकट अंगावर झेलणारे शिवसैनिक होते. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर किती खटले दाखल झाले आणि शिवसैनिक किती अडकले हे तपासा.

एकनाथ शिंदे

२६ जून २०२२

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....

२७ जून २०२२

हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!

(उपाध्यक्षांच्या नोटिशीवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर)

२८ जून २०२२

हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व आमदार

स्वेच्छेने येथे (गुवाहाटीत) आले आहेत.

ताकद कुणाची?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पुकारलेले बंड महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणारे ठरते आहे. शिवसेनेला बंड नवे नसले, तरी आतापर्यंतची बंडाची व्याप्ती अभूतपूर्व आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाला अस्वस्थ करणारे आणि संभ्रमात टाकणारे राजकीय वातावरण आसपास आहे. एका बाजूला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभे असणारे बंडखोर, अशी राजकीय परिस्थिती शिवसैनिकांसमोर उभी आहे. अशा काळात शिवसैनिकांच्या मनात काय चालले आहे, शिवसेना पक्षप्रमुखांच्या भूमिकेबद्दल त्यांना काय वाटते, बंडखोर आमदारांची आजची ताकद काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यासाठी राज्याच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून शिवसैनिकांची मते जाणून घेतली. सर्वेक्षण, सर्वेक्षणातून समोर येणाऱ्या आकडेवारीचा अर्थ आणि त्यातून किलकिला दिसणारा उद्याचा राजकीय सारीपाट दाखवणारे शिवसेना नेक्स्ट...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.