सोलापूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छ व सुंदर शहर’ म्हणून कागदोपत्री डंका मिरवणाऱ्या सोलापूर महापालिकेने महिलांसाठी शहरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारलेले नाही. नवीपेठ असो वा पार्क चौपाटी, विजापूर वेस, सराफ बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असायला हवी होती. पण, ना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ना लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. एकीकडे स्मार्ट सिटीचा डंका तर दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, या विरोधाभासाकडे ना सरकारने ना महिला आयोगाने दखल घेतली, हे विशेष.
शहराचा विस्तार वाढत असतानाच रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. पण, काही मोजके रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये पार्किंगची सोय नाही. दुसरीकडे, शहरात ठिकठिकाणी पुरुषांसाठी ३८० स्वच्छतागृहे आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून बसविलेले दहा ई-टॉयलेट आहेत. तर २२ ठिकाणी पैसे देऊनच नैसर्गिक विधी उरकावे लागतात. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन तत्कालीन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या माध्यमातून महिलांसाठी शहरातील होम मैदान, भांडे गल्ली, पार्क स्टेडियम या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणीचे नियोजन सुरू केले होते. पण, त्याला मुहूर्त स्वरूप मिळाले नाही आणि तो विषय मागेच पडला. घनकचरा विभागाकडे सध्या २२५ कर्मचारी असून त्यांच्या माध्यमातून सामुदायिक शौचालयांची स्वच्छता केली जाते. तर ३५ कर्मचारी स्वच्छतागृहांची स्वच्छता करतात, असे सफाई अधीक्षकांचे म्हणणे आहे. पण, वास्तविक पाहता बहुतेक शौचालयांमध्ये लोकांना जाणे मुश्किलीचे झाल्याची स्थिती आहे.
पुरस्कारासाठी कागदोपत्री जुळवाजुळव
‘स्वच्छ भारत मिशन’मधून चांगला पुरस्कार मिळावा म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: कागदोपत्री बनवाबनवी केल्याची बाब उघड झाली आहे. शहरात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जागेअभावी वैयक्तिक शौचालये उभारणे कठीण असते. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून त्या परिसरात सामुदायिक शौचालयांची सोय करून दिली जाते. सोलापूर शहरात ३१५ सामुदायिक शौचालये आहेत. पण, पुरस्कारासाठी शासनदरबारी माहिती देताना त्याच सामुदायिक शौचालयांना सार्वजनिक स्वच्छतागृहे तथा शौचालये म्हणून दाखविले गेले. प्रत्यक्षात महिलांची सोय असलेली स्वच्छतागृहे शहरात नाहीतच, असे महापालिकेतील सूत्राने सांगितले.
शहराची सद्य:स्थिती
कुटुंबांची संख्या
१.३१ लाख
एकूण अंदाजित लोकसंख्या
११.६० लाख
अठरा वर्षांवरील महिला
३.१५ लाख
सामुदायिक शौचालये
३१५
सार्वजनिक शौचालये तथा स्वच्छतागृहे
०००
शाळांबाहेर कचऱ्यांचे ढीग
स्वच्छ शहर, सुंदर शहर असे फलक, पोस्टर, भित्तिचित्रे काढण्यासाठी व जनजागृतीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला आहे. शाळा-महाविद्यालयांतील मुलांच्या पथनाट्यांतूनही प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला. पण, अक्षरश: शहरातील बऱ्याच शाळांसमोर किंवा आजूबाजूला कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. पावसाळ्यात त्याच कचऱ्याच्या पाण्यातून चिमुकल्यांना वाट काढावी लागत आहे. नूतन मराठी विद्यालय, स. हि. ने. प्रशालेसमोर, लष्कर परिसरातील महापालिकेच्या शाळेसमोरच लोक कचरा टाकत आहेत. अनेकदा शाळांनी पत्रव्यवहार करूनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अद्याप त्या ठिकाणी कचरा टाकणे सुरूच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.