स्मार्ट सिटी सोलापुरात ‘ती’ची कुचंबणा! मुख्य बाजारपेठांत ना स्वच्छतागृहे ना पार्किंग; महिलांसह मधुमेही रूग्णांसमोर अडचणी; ११ लाख लोकसंख्येच्या शहराची ‘अशी’ आहे वस्तुस्थिती

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगले रस्ते, नियमित पाणी, स्वच्छतासह चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नवीपेठ, सराफ बाजार, कुंभारवेस, तुळजापूर वेस, बाळीवेस, माणिक चौक, टिळक चौक येथील बाजारपेठांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेषत: महिला व मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे सुद्धा नाहीत.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal
Updated on

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगले रस्ते, नियमित पाणी, स्वच्छता, विरंगुळासह चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरातील नवीपेठ, सराफ बाजार, कुंभारवेस, तुळजापूर वेस, बाळीवेस, माणिक चौक, टिळक चौक येथील बाजारपेठांमध्ये वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेषत: महिला व मधुमेहाच्या रुग्णांसाठ स्वतंत्र स्वच्छतागृहे (मुतारी) सुद्धा नाहीत. दहा ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहांचा प्रस्ताव असून चार ठिकाणी सध्या कामे सुरू आहेत. मात्र, त्यात मुख्य बाजारपेठांमधील एकही ठिकाण नाही, हे विशेष.

महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडील माहितीनुसार शहरात ३१५ सार्वजनिक शौचालये, १५० ठिकाणी मुताऱ्या आहेत. मात्र, त्यातील बंद किंवा सुरू किती, तेथील स्वच्छतेची स्थिती काय, याची खात्रीशीर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे नाही. अधिकारी म्हणतात, मधला मारुती, बाळीवेस, मंगळवार बाजार, जोडभावी पेठ, होम मैदान, सात रस्ता (नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ) अशा ठिकाणी ई-टॉयलेट आहेत. मात्र, त्याठिकाणी मुतारीची सोय नसल्याने अनेकदा त्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात.

बाजारपेठांमधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला, तरुणींची संख्या एक हजारांपर्यंत असून बाजारपेठांमध्ये दररोज हजारो महिला, तरुणी वस्तू खरेदीसाठी येतात. त्यांच्यासाठी प्रमुख बाजारपेठांमध्ये स्वच्छतागृहेच नाहीत अशी स्मार्ट सिटीतील वस्तुस्थिती आहे. महापालिकेच्या अनेक जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या असून त्याठिकाणी पार्किंग व स्वच्छतागृहाची सोय करावी, अशी मागणी होत असतानाही त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नसल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे.

अनेक वर्षांपासून प्रश्न सुटलेच नाहीत

व्यापाऱ्यांच्या अडचणींसंदर्भात अनेकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका पार पडल्या. त्या प्रत्येकवेळी नवीपेठेसह प्रमुख बाजारपेठांमधील वाहनांची पार्किंग व महिला-पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या विषयावर चर्चा झाली. पण, अनेक वर्षांनंतरही दोन्ही विषय जैसे थे आहेत. दोन्ही प्रश्न मार्गी लागल्यास ग्राहकांसह बाजारपेठांमधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांची सोय होईल.

- अशोक मुळीक, अध्यक्ष, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर शहर

-----------------------------------------------------------------------

ग्राहकांच्या सोयीसाठी हवीत स्वच्छतागृहे

कुंभारवेस, माणिक चौक, तुळजापूर वेस, बाळीवेस, नवीपेठ या प्रमुख बाजारपेठांच्या ठिकाणी भांडे, कापड, सराफ, किरणा, शैक्षणिक साहित्यासह अन्य साहित्य व वस्तू विक्रीची मोठी दुकाने आहेत. त्याठिकाणी नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. परगावाहून अनेक ग्राहक त्याठिकाणी वस्तू खरेदीसाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे जरुरी आहेत.

- गिरीश देवरमणी, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, सोलापूर शहर

आकांक्षी स्वच्छतागृहे मंजूर १० अन्‌ काम सुरू चारचेच

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्याने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० अंतर्गत’ आकांक्षी स्वच्छतागृहे उभारणीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारसोबतच केंद्राचेही अर्थसाहाय्य असून महापालिकेलाही काही हिस्सा भरावा लागतो. योजनेतून सोलापूर शहरात १० ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहे अपेक्षित आहेत. सध्या नाना-नाणी पार्क, क्रोमा शोरूम, जुळे सोलापूर पाण्याची टाकी व विणकर गार्डन येथे कामे सुरू आहेत. मात्र, रुपाभवानी अग्निशामक दलाजवळील परिसरात, कंबर तलाव, गेंट्याल टॉकीज, साधुवासवानी परिसर व वालचंद कॉलेज येथील कामे अद्याप सुरू झाली नसून ती कागदावरच आहेत. तर नवीपेठेतील जुनी महापालिका इमारतीजवळ व वालचंद कॉलेजजवळ आकांक्षी स्वच्छतागृहे उभारायचे नियोजित होते, पण ऐतिहासिक वास्तुजवळील त्या कामाला विरोध झाल्याने ते काम रद्द झाले. त्याऐवजी गुरुनानक चौकातील साधुवासवानी परिसरात आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला. पण, त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आकांक्षी स्वच्छतागृहे म्हणजे काय?

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची सोय व्हावी म्हणून राज्य सरकारने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० अंतर्गत’ ही स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. त्यात मुतारी व शौचालयाची स्वतंत्र सोय असते. ६०० ते ७०० स्केअर फूट जागेत ४ मुताऱ्या, १० शौचालये अशी व्यवस्था केली जाते. चार मुताऱ्या, दहा शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी ३३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून शहरात केवळ दहा ठिकाणी अशी व्यवस्था होणार आहे.

संपूर्ण शहरातील स्थिती

  • अंदाजे लोकसंख्या

  • ११ लाख

  • सार्वजनिक शौचालये

  • ३१५

  • सार्वजनिक मुतारी

  • १५०

  • नियोजित आकांक्षी स्वच्छतागृहे

  • १०

  • आकांक्षी स्वच्छतागृहाची कामे

‘या’ प्रमुख ठिकाणी हवीत स्वच्छतागृहे

नवीपेठ, चाटे गल्ली, सराफ बाजार, कुंभारवेस, तुळजापूर वेस, बाळीवेस, माणिक चौक, टिळक चौक, कंबर तलाव, गेंट्याल टॉकीज, साधुवासवानी परिसर, वालचंद कॉलेज, आसरा चौक, डी-मार्ट (जुळे सोलापूर), रंगभवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जगदंबा चौक (दक्षिण सदर बाजार), सिव्हिल चौक, विजापूर वेस, सरस्वती चौक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.