सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमध्ये सध्या नऊ हजार शिक्षक आहेत. पटसंख्येच्या तुलनेत सध्या समाजशास्त्र विषयांचे शिक्षक भरपूर असून त्यातील तब्बल २१० शिक्षक जास्त झाले आहेत. त्यांना अतिरिक्त होण्याची भीती असल्याने त्यांच्याच विनंतीवरून आता उपशिक्षक म्हणून त्यांचे डिमोशन केले जाणार आहे.
इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गात किमान दोन जरी विद्यार्थी असतील तरी त्याठिकाणी विज्ञान-गणित व भाषेचा प्रत्येकी एक शिक्षक दिला जातो. त्यानंतर पटसंख्या ४५ पेक्षा अधिक झाली आणि पुढे तेथे आठवीचा वर्ग असल्यास तिसरे पद समाजशास्त्राचे मंजूर होते.
पटसंख्या ७५ ते १०० पर्यंत असल्यास त्या शाळांमध्ये चौथा शिक्षक विज्ञान विषयाचा मिळतो. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाजशास्त्र विषयाचे १६१ पदे मंजूर आहेत, पण सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये समाजशास्त्राचे तब्बल ४०० शिक्षक आहेत. त्यामुळे सध्या २३९ शिक्षक अतिरिक्त आहेत.
त्यापैकी २१० शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरुपात उपशिक्षक करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आता कार्यवाही केली जाणार आहे. विषय शिक्षकांवर सहावी ते आठवीच्या वर्गाची तर उपशिक्षकांवर पहिली ते पाचवीच्या वर्गांची जबाबदारी असते. विषय शिक्षक म्हणून काम केलेल्या समाजशास्त्राच्या त्या शिक्षकांना आता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवावे लागणार आहे.
शिक्षक होणार केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक
प्राथमिक शाळांवरील १८५ शिक्षकांना विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व पूर्णवेळ मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे. त्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु असून पुढील १०-१५ दिवसांत ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात चार विस्ताराधिकारी, ७९ केंद्रप्रमुख व १०३ मुख्याध्यापक असणार आहेत. १० जून २०१४च्या अधिसूचनेनुसार शिक्षकांमधूनच केंद्रप्रमुख होणार आहेत. त्याठिकाणी विषयानुसार व बी.एड झालेल्यांना संधी मिळणार आहे. दुसरीकडे विस्ताराधिकारी होण्यासाठी पदवीला किमान ५० टक्के गुण आणि बी.एडची अट आहे. सेवाज्येष्ठेनुसार या निवडी होतील.
२०२२-२३ची संचमान्यता लवकरच
चालू शैक्षणिक वर्षाची संचमान्यता काही दिवसांतच होणार असून प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांचा आधारक्रमांक सरल पोर्टलवर नोंदवलेला आवश्यक आहे. तीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. तत्पूर्वी, आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार काढणे, ज्या विद्यार्थ्यांच्या नावात वगैरे चुका आहेत, त्याचीही दुरुस्ती केली जात आहे. त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. त्यानुसार किती शिक्षक अतिरिक्त होतात किंवा किती शिक्षक वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.