सोलापूरच्या एज्युकेशन हबमध्ये आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भर! ५० वर्षांनंतर मिळतेय शासकीय महाविद्यालय; चंद्रकांत पाटलांकडून जलद निर्णयाची अपेक्षा

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सोलापूरसाठी मिळालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला पळवून नेल्याबद्दल सोलापूरकरांमध्ये नेहमीच अन्यायाची भावना राहिली होती. प्रत्येक विद्यापीठात एक तरी शासकीय अथवा शासन अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय असावे, असा शासनाचा दंडक होता.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal
Updated on

सोलापूर : सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्याचे स्वप्न अखेर साकारत असल्याचे पाहून मनोमन आनंद झाला. या महाविद्यालयामुळे सोलापूरच्या इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन हबमध्ये भर पडणार असल्याने विकासाच्या दृष्टीने सोलापूर एक पाऊल पुढे टाकेल, हे निश्‍चित!

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सोलापूरसाठी मिळालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला पळवून नेल्याबद्दल सोलापूरकरांमध्ये नेहमीच अन्यायाची भावना राहिली होती. प्रत्येक विद्यापीठात एक तरी शासकीय अथवा शासन अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय असावे, असा शासनाचा दंडक होता. त्यानुसार सोलापूरसाठी तेव्हा मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला नेण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील हे पहिले तर दुसरे सांगलीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय अनुदानाने चालविले जात आहे. सोलापूरकरांनी तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ हा अन्याय सहन केला. सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ होऊनही २० वर्षांचा कालावधी लोटला. आता कुठे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळाले. सरकार कोणाचेही असो, सोलापूरला नेहमीच सापत्नपणाची वागणूक ठरलेली. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचे आदेश तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले होते. याच तंत्रनिकेतनचा वापर अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी करण्याचाही निर्णय घेतला होता.

१९५६ मध्ये सुरू झालेले, सोलापूरचे वैभव असलेले शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्यास माजी विद्यार्थी संघटना, जीपीएस बचाव समिती, कृती समिती व विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी वेगवेगळी आंदोलने करीत विरोध केला. तंत्रनिकेतन तर हवेच, त्याचबरोबर आमचे पळविलेले अभियांत्रिकी महाविद्यालय पुन्हा आम्हाला द्या, अशा मागणीने तेव्हा जोर धरला होता. शासनाने सोलापूरला शासकीय तंत्रनिकेतन तसेच ठेवून अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले. त्यानंतर २०२० मध्ये तंत्रनिकेतनने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वंकष आराखडा शासनाला पाठवला होता. केंद्राच्या पहिल्या टप्प्यातच सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाल्याने सर्वाधिक आनंद झाला होता; आता उशिराने का होईना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळत आहे, त्यात ३०० कोटींची तरतूद करून यंदाच्या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने उत्साह दुणावला.

सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनच्याच इमारतीत, आहे त्या पायाभूत सुविधांचा वापर करून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. यामध्ये प्राध्यापक, इमारत, वसतिगृह, क्रीडा मैदान, ग्रंथालय, वर्कशॉप या सुविधांची उपलब्धता असून पहिले वर्ष सुरू करण्यास काही अडचण नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. परंतु विद्यापीठाची मान्यता व एआयसीटीईकडे प्रस्ताव, त्यांच्या कमिटीकडून पाहणी आणि त्यानंतर मान्यता जरूरी असल्याने शासनाने ठरविले तरीही विविध प्रक्रिया होण्यास काही वेळ लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘आले सरकारच्या मना’ असे झाले तर काहीही होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यात सध्या १५ खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतून तब्बल चार हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, सोलापुरातील अभियंते कष्ट, बुद्धिमत्ता, कामाचा आवाका यामध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सरस असल्याचेही सांगण्यात येते. ही जमेची बाजू आहे. सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्याने खासगी महाविद्यालयांवर त्याचा फारसा काही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या महाविद्यालयांनी गुणवत्तेवर भर तसेच गुणवंतांची कदर केली आहे, त्यांना काही फटका बसणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उलट, या महाविद्यालयामुळे सोलापूरच्या शैक्षणिक प्रगतीत व विकासात भरच पडणार असल्याचे ते सांगतात. प्रत्यक्षात सोलापुरातील अल्पउत्पन्न गटातील विद्यार्थी व तंत्रनिकेतनचे शिक्षण पूर्ण करून पदवीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. पदविकेनंतर पदवीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणाची संधी मिळणार आहे. केवळ शासकीय पदवी महाविद्यालय नसल्याने पुढील शिक्षण थांबवणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या खूप मोठी आहे.

सोलापूर मेडिकल हब, टेक्स्टाईल हब, गारमेंट हब अन् आता एज्युकेशन हब

लातूरचे पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन बंद करून तेथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. परंतु, जनरेट्याबरोबरच राजकीय इच्छाशक्तीमुळे हे तंत्रनिकेतन सुरू ठेवून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळविण्यात लातूरकरांनी यश मिळविले. लातूरला शक्य मग सोलापूरला का नाही, या प्रश्‍नावर २०१६ मध्ये प्रचंड खल झाला होता. त्याचाच परिपाक म्हणून तंत्रनिकेतनही सुरू राहिले अन् अभियांत्रिकीही मिळाले. सोलापूरचा नावलौकिक मेडिकल हब, टेक्स्टाईल हब, गारमेंट हब अन् आता एज्युकेशन हब म्हणूनही होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.