पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
Updated on

एक पक्ष, एक विचार आणि एका मतदारसंघातून सातत्याने ११ वेळा विधानसभेवर निवडून येणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे गुरुवारी निधन झाले. साधी राहणी, तत्त्वनिष्ठ आणि कष्टकरी, वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या साधेपणाचे अनेक प्रसंग, त्या आठवणी शिपाई म्हणून काम केलेले दिलीप शेवडे यांनी ‘सकाळ’ला सांगितल्या.

१९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात शेकाप पक्ष सामील झाला. गणपतराव देशमुख यांना पणन आणि रोहयो हे महत्त्वाचे खाते मिळाले. मंत्रालयापुढचा ‘ए-६’ हा बंगला त्यांना मिळाला. त्याआधी ते मॅजेस्टिक आमदार निवासात राहत असत. जवळपास साडेतीन वर्षे देशमुख त्या बंगल्यात राहिले; मात्र त्यांनी बंगल्याची एकदाही रंगरंगोटी केली नाही, फर्निचर केलं नाही, साधा टेबलही त्यांनी त्या साडेतीन वर्षांच्या काळात बदलला नाही. शासनाच्या पैशांची उधळपट्टी करायची नाही, हे त्यांचे तत्त्व ते कठोरपणे पाळायचे.

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

मंत्री असताना शासकीय निवासस्थानी वाचण्यासाठी, कात्रणे काढण्यासाठी वृत्तपत्र यायची. महिना, दोन महिन्यांनंतर, देशमुख एकदोन रद्दीवाल्यांकडून रद्दीचे भाव काढून घ्यायचे. सर्वांत जास्त भाव देणाऱ्याला ते पेपरची रद्दी विकायचे. रद्दीतून मिळालेली रक्कम सामान्य प्रशासन विभागाच्या रोख शाखेत जमा करायला ते कर्मचारी पाठवायचे. एखाद्या मंत्र्याने पेपरच्या रद्दीचे पैसै जमा करायला देणे, हा त्या अधिकाऱ्यापुढचा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे ते पैसे कुठल्या हेडखाली जमा करायचे, त्यासाठी तरतूद काय हा पेच अधिकाऱ्यांना पडला; मात्र शासनाच्या हक्काचे पैसे असल्याने ते जमा करून त्याची पावती घेईपर्यंत कर्मचारी हटत नसे.

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार

नागपूर अधिवेशनादरम्यान मुंबईतून १० ते १५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ नागपूरला यायचा. या सर्व कर्मचाऱ्यांचा स्वयंपाक त्यांच्या पत्नी करायच्या. सर्व कर्मचाऱ्यांना डायनिंग टेबलवर बसवून दोघे पती-पत्नी जेवण वाढायचे. त्यांचे जेवण आटोपल्यावर ते स्वतः जेवण करायचे. कर्मचाऱ्यांबद्दल इतकी आस्था असणारी व्यक्ती मी पहिल्यांदा अनुभवली. पणनमंत्री म्हणून एकदा ते परभणीच्या दौऱ्यावर गेले. दौरा संपला आणि आम्ही तिथले शासकीय विश्रामगृह सोडले; मात्र प्रवासात त्यांनी अचानक जेवणाचे, नाश्त्याचे पैसे भरले का, भरले तर पावती कुठे आहे असा प्रश्न केला. आम्ही पैसे भरले नव्हते; मात्र गाडी ११ किलोमीटर लांब आली होती. गणपतराव देशमुख यांनी गाडी तिथेच थांबवली, खिशातून पैसे काढले, तातडीने पैसे भरून, पावती घेऊन येण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला लागले. ते जेवणाचे पैसे स्वतःच द्यायचे, इतर कुणीही पैसे दिलेले त्यांना आवडत नसे.

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण

पणनमंत्री झाल्यावर वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम ठेवला गेला. या कार्यक्रमात त्यांनी हारतुरे स्वीकारले. त्यादरम्यान एका अधिकाऱ्याने त्यांच्या शासकीय वाहनात फळांची पेटी ठेवली. बंगल्यावर पोहोचल्यावर ड्रायव्हरने गाडीतून पेटी उचलून आत आणली. देशमुखांच्या ते लक्षात आले. त्यावर त्यांनी ही पेटी कुणाची आहे असा प्रश्न केला. सर्व माहिती घेतल्यावर त्यांनी फळाची पेटी स्वीकारायला नकार दिला. त्या अधिकाऱ्याला बंगल्यावर बोलावून ती फळाची पेटी परत दिली. पुन्हा असे न करण्याची तंबीच त्यांनी दिली. त्यानंतर ते शांत झाले. सांगोल्यात त्यांची सहकारी सूतगिरणी होती. सांगोल्याला आले असता स्टाफला सूतगिरणीच्या विश्रामगृहात थांबण्यास सांगितले; मात्र कर्मचाऱ्यांचे जेवण, चहा-पाण्याचा खर्च स्वतः भरला.

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना केंद्राचा इशारा

ते फक्त घरचे जेवण जेवायचे. जेवणाचा डबा कर्मचारी आणून ठेवायचे. तो डबा ते स्वतः उघडायचे, जेवण झाले की डबा धुऊन ठेवायचे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अत्यंत आपुलकीने ते सर्वांची विचारपूस करीत. दर दिवाळीला प्रत्येकास छोटी का होईना ते भेटवस्तू द्यायचे. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी त्या भेटी आजही अनमोल ठेवा म्हणून जपून ठेवल्या आहेत.

एकदा नागपूर अधिवेशनाच्या काळात त्यांचे मनगटी घड्याळ बंद पडले. घड्याळ दुरुस्त करायला नागपूरच्या बर्डी चौकात पुलाखाली असलेल्या दुकानात आम्ही गेलो; मात्र हे वैयक्तिक स्वरूपाचे काम आहे. त्यामुळे त्यासाठी शासकीय गाडी वापरायची नाही असे त्यांनी सांगितले. एक जीप घेतली. त्यातून आम्ही निघालो. मी मंत्री आहे, असे त्या दुकानदाराला सांगायचे नाही, अशी ताकीदच त्यांनी स्टाफला दिली होती. त्यांचे घड्याळ दुरुस्त करायला त्या दुकानदाराला २० ते २५ मिनिटे लागली. इतका वेळ मंत्री असलेला हा माणूस काऊंटरवर बसला होता. घड्याळ दुरुस्त झाल्यानंतर मी हळूच दुकानदाराला ते मंत्री असल्याचे सांगितले. त्या दुकानदाराचा माझ्यावर विश्वास बसला नाही. त्याने आयुष्यात असा माणूस पाहिला नव्हता. शासकीय वाहनांचा त्यांनी कधी व्यक्तिगत कारणांसाठी वापर केला नाही. कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी वाहनाचा वापर करू दिला नाही.

पेपरच्या रद्दीचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारा मंत्री
राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनासमोर चोपलयाशिवाय राहणार नाही!

एखाद्याचे काम करायचे असेल तर त्याला अमूक वेळेत तुझे काम होईल, असे ते स्पष्ट सांगायचे. जर त्या वेळेत काम झाले नाही, तर मला पुन्हा भेट असे सुचवायचे. त्यांना प्रशासनात एवढा मान होता, की त्यांनी टाकलेला शब्द कधी खाली पडला नाही. त्यांच्या दालनात खूप गर्दी असायची. विलासराव देशमुख सरकारमधून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही तासांत त्यांनी शासकीय बंगला खाली केला. शासकीय वाहन वापरले नाही, खासगी वाहनाने साहित्य बांधून ते थेट सांगोल्याला निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.