सोलापूर : राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोचून त्यांना लाभ देणे. तसेच योजनांचा प्रचार व प्रसार करणे आणि नागरिकांशी संवाद साधून संभाव्य लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून (ता.२३) २६ जानेवारी २०२४ पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेला सुरवात झाली आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेत गावस्तरावरील विविध योजनांची माहिती व लाभ लाभार्थींपर्यंत पोचविली जाणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. योजना सुरू होऊन २०-३० वर्षे झाली, तरीदेखील अनेकांना लाभ मिळालेला नाही. अशा लोकांसाठीच ही यात्रा काढण्यात येत आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात आठ व्हॅन प्रत्येक गावात जाणार आहेत.
यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता.२३) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी विस्ताराधिकारी बी.सी. पाटील, आर.एस. राठोड, ग्रामसेवक एस.यू. राठोड आदी उपस्थित होते. याप्रसंगी लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले.
गावकऱ्यांना मिळणार ‘या’ योजनांची माहिती अन् लाभ
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांपासून वंचित राहिलेल्या गावोगावच्या लाभार्थींना लाभ मिळणार आहे. त्यात आयुष्यमान भारत योजना, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम उज्वला गॅस योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हरघर जल योजना (जलजीवन योजना), जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम, नॅनो खत, शिष्यवृत्ती योजना, नरेगा जॉबकार्ड, गावांचे सर्वेक्षण व खेड्यातील सुधारित तंत्रज्ञानासह मॅपींग अशा योजनांची माहिती व लाभ दिले जातील. तसेच लाभार्थी नोंदणीही यावेळी केली जाणार आहे. त्यावेळी प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.