Solapur: विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांमध्ये ३५ गुण नाही मिळाले तर तो विद्यार्थी नापास होतो. त्याला पुढे परीक्षा देऊन तेवढे गुण घ्यावेच लागतात. पण, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्या दोन्ही विषयात किमान 20 गुण मिळाले तरी अकरावीला प्रवेश मिळणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार याची अंमलबजावणी पुढील दोन वर्षात अपेक्षित आहे.
गणितातील आकडेमोड, बीजगणिताची सूत्रे, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या विषयाची भीती वाटते. ही भीती दूर करण्याचा प्रयत्न राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) तयार केलेल्या तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने प्रस्ताव दिला आहे
. सीबीएसईच्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. कारण, दहावीत इतर सर्व विषयांमध्ये चांगले गुण मिळाले. मात्र गणित आणि विज्ञान विषयांत मागे राहिल्याचे अनेक विद्यार्थ्यांबाबत घडते. या दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने अथवा त्या विषयांच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण थांबवावे लागल्याचेही समोर आले आहे. तसे निरीक्षणही या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात नोंदवण्यात आले आहे.