ST Bus Accident : राज्यातील एसटी बस अपघातांचे प्रमाण शुन्यावर आणणार - दादा भुसे

विधान परिषद सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
ST Bus Accident
ST Bus Accidentsakal
Updated on

मुंबई - राज्यात एसटी बस अपघातांचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी एसटी मार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री भुसे म्हणाले, प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 2017-18 मध्ये शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य परिवहन स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे 245 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसेसचे 60 असे एकूण 305 अपघात झाले आहेत.

यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सन 2023-24 मध्ये मे 2023 अखेर स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे 47 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसेसचे चार असे एकूण 51 अपघात झाले असून यामध्ये 3 जणांना मृत्यू झाला आहे.

स्वमालकीच्या शिवशाही बसेसवरील चालकांना शिवशाही बस चालविण्याचे पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय शिवशाही नियतावर कामगिरी देण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत. बस चालकांना शिवशाही बसचे प्रशिक्षण देण्यासाठी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी येथे एसटी महामंडळातील सुमारे 100 वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रत्येक विभागातील चार प्रशिक्षीत चालकांमार्फत सर्व विभागातील चालकांना नियमितपणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडुन विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आतापर्यंत 12 कोटी 89 लाखांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून, यासाठी एसटी ला 662 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजनेचा 17 कोटी 42 लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला. यासाठी 505 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.

चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आरोग्य तपासणीसाठी तीन हजार रूपये, वेतन व भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 500 हून अधिक बसस्थानकांचे सुशोभिकरण, स्वच्छता, बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीच्या ताफ्यात नवीन ई-बसेस घेण्यात येणार आहेत. तथापि त्यांचा सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यायेण्यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगून नाशिक येथील महानगरपालिकेची सध्या बंद असलेली बससेवा तातडीने सुरू होण्याबाबत आजच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नासंदर्भात बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.