ST News : लाडक्या गणरायाचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या चाकरमान्यांची पावले गणपती सणाला गावाकडे आपसुक वळतात. यासाठी एस. टी. प्रशासनदेखील सहकार्य करीत असते.
चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बस सोडण्यात येतात. जव्हार आगारात एकूण ५६ वाहने आहेत; मात्र गणेशोत्सवासाठी १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत ३० वाहने कोकणात पाठविल्याने जव्हारवासीयांचे प्रचंड हाल झाले. या भागातील प्रवाशांना एसटीच्या फेऱ्या रद्दचा चांगलाच फटका जाणवत आहे.
गणेशोत्सवाला लांब पल्ल्याच्या सेवेसाठी स्थानिक ग्रामीण भागातील तसेच शहरातील फेऱ्या रद्द केल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात या फेऱ्या रद्द केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना गाडीसाठी ताटकळत थांबावे लागत आहे. मुख्यतः दुर्गम भागातील प्रवाशांना याचा फटका बसत आहे. पाच दिवस ही प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने जव्हार एस. टी. आगाराने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुळातच मागणीच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी फेऱ्या आहेत. त्यामुळे सर्व गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात; मात्र या फेऱ्या रद्दने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. रद्द केलेल्या फेऱ्यांत काही मुक्कामाच्या गाड्या आहेत. यामुळे सकाळी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी गावातून लवकर बाहेर पडणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच दोन दिवस सुट्टीमुळे गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रवाशांना सहकुटुंब स्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे.
आगार प्रशासनाशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानुसार मुंबईला ३० बस पाठवल्या आहेत. गणपतीच्या सुटीत विद्यार्थ्यांची कमी संख्या लक्षात घेऊन मुक्कामाच्या गाड्या कमी केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची कमीत कमी गैरसोय होईल हे पाहिले असल्याचे सांगण्यात आले. शिवाय बसफेऱ्या रद्द होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमावर पाठविल्याचे सांगितले.
या फेऱ्या रद्द
जव्हार-कल्याण- पुणे सकाळी ९ वाजता
जव्हार-बारामती सकाळी ६.४५ वाजता
जव्हार- शिर्डी सकाळी ६ वाजता
जव्हार-सेलवास-नाशिक रोड सकाळी ११ वाजता
जव्हार- नाशिक- पुणे दुपारी १ वाजता
जव्हार-कळवण सकाळी ७.४५
जव्हार-बोरिवली सकाळी ८ वाजता
जव्हार-ऐना-ठाणे दुपारी २ वाजता
जव्हार-कल्याण-वाडा दुपारी २ वाजता
जव्हार-ठाणे सकाळी ६ वाजता
जव्हार-ठाणे दुपारी १ वाजता
जव्हार-ठाणे सकाळी ८.३० वाजता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.