Aditya Thackeray : राज्यातील सरकार बिल्डर व ठेकेदारांचेच आहे का?

आदित्य ठाकरे यांनी रविवारी शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Updated on

पुणे - ‘काही राजकीय व्यक्ती गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात, त्यांचे आमदार थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार करतात. भाजपचे आमदार पोलिसांना मारहाण करतात. आम्हाला कोणीही हात लावू शकत नाही, अशा धमक्‍या देतात. पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडतात, या सगळ्या घटनांवरून राज्यात सरकार आहे की नाही का? असा प्रश्‍न पडतो.

तसेच, हे सरकार फक्त बिल्डर, ठेकेदारांचेच आहे का? सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे हे सरकार लक्ष देणार आहे का?’ अशी खरमरीत टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी भाजप व मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी रविवारी शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यासारख्या शहरात सरकारच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी चुकीची कामे सुरु आहेत.

त्यामुळे हे सरकार ठेकेदारांचे, बिल्डरांचे आहे, की सर्वसामान्य नागरिकांचे आहे, असा प्रश्‍न पडतो. पुण्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा सापडला. राजकारणी लोकांचे गुंडांसमवेतचे फोटो समोर येत आहे. राजकीय लोकांचे गुंडांशी असणाऱ्या संबंधांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात खरोखरच सरकार अस्तित्वात आहे का ? असा प्रश्‍न पडतो.’’

‘मुख्यमंत्री शिंदे हे अमावस्या आणि पौर्णिमेलाच शेती करायला जातात. विकासकामांचे प्रकल्प तयार असूनही, नागरिकांना वाहतूक समस्या व अन्य अडचणींना सामोरे जावे लागत असूनही केवळ उद्‌घाटनासाठी प्रकल्प अडवून ठेवले आहेत,’ अशी टीका ठाकरे यांनी केली. ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या काळात राज्याच्या विकासाची बसलेली घडी, मिंधे सरकारच्या काळात बिघडली आहे.

मेट्रो आणि विमानतळासह अनेक मोठे प्रकल्प तयार आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांना त्याचे उद्‌घाटन करण्यास वेळ नाही. भाजपची नेमकी काय विचारधारा आहे, हे कळत नाही. विद्यमान सरकारच्या काळात दोन वर्षांत दोनदा कृषीमंत्री बदलले आहेत. त्यांच्यापैकी एकही जण शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही, शेतकऱ्यांचा विमा देखील त्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.’

...त्यांनी पक्ष फोडले अन्‌ घरही फोडले!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा,’ असे विधान केले आहे, त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, ‘भाजपने मागील वर्षी शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षही फोडला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी राष्ट्रवादीचा परिवारही फोडला आहे. आता कॉंग्रेस पक्ष फोडत आहेत. त्यामुळे त्यांना आता लोकशाही नको आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.