मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांवर येत्या दोन दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवारी दिल्लीत दाखल झाल्यामुळे या कारवाईला वेग येणार असल्याचे समजते. मतमोजणी झाल्यानंतर काही तासांत या फुटीर आमदारांची नावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. विधानपरिषद निवडणुकीत सात आमदारांची मते फुटल्यामुळे काँग्रेसला मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागले.
लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात सर्वाधिक १४ जागा जिंकून काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला; मात्र महिन्याभरात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटल्याने काँग्रेसच्या आत्मविश्वासाला धक्का बसला आहे. पक्षाने पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतदानाचे सूत्र ठरविले होते. त्यामुळे गुप्त मतदान असले तरी ठरवलेल्या सूत्रानुसार मतदान न करणाऱ्या आमदारांची नावे पक्षाला तातडीने लक्षात आली. त्यामुळे अवघ्या ३० मिनिटांत या आमदारांचा शोध घेऊन त्यांचा अहवाल तातडीने दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला.
राजकीय गणिते
विधान परिषद निवडणुकीत पक्षाचा आदेश मोडून मतदान करणाऱ्या बहुतांश आमदारांनी आगामी विधानसभेतील राजकीय गणित जुळवून मतदान केले. मुंबईतील एका आमदाराने पक्षाला अनधिकृतपणे सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षासोबत घरोबा केला आहे; तर विदर्भातील एका महिला आमदाराला दुसऱ्यांदा तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने बंडखोरी केल्याचे कळते. मराठवाड्यातील दोन आमदारांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्याच्या सांगण्यावरून पक्षादेश झुगारला. या आमदारांवर कारवाई झाली तरी विधानसभेत दुसऱ्या पक्षाकडून सामावून घेण्याचे आश्वासन मिळाल्याचे समजते.
कठोरात कठोर कारवाई
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या आहेत. तसेच ‘इंडिया’ आघाडीला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. पक्ष पहिल्यासारखा कमकुवत राहिला नाही. त्यामुळे पक्षात बंडखोरी, गटबाजी पक्षशिस्त मोडणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. त्यामुळे पक्षादेशाविरोधात मतदान करणाऱ्या या आमदारांवर कठोरातील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यातच या आमदारांवर पक्षातून हकालपट्टीचीही कारवाई होऊ शकते.
माझे मत फुटलेले नाही. मी सांगितल्याप्रमाणे मतदान केले आहे. ज्याचे मत फुटले असेल त्याच्यावर कारवाई करावी. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हकालपट्टीची भाषा वापरली जाते, हे थांबले पाहिजे. या मतावर मी ठाम आहे. पक्षाने सांगितल्याप्रमाणे आम्ही मतदान केले.
-हिरामण खोसे,
काँग्रेस आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.