सोलापूर : सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांसाठी जुळे सोलापूर परिसरात २०२० मध्ये लघू न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू झाली. मृत्यूनंतर संबंधित मृताचा व्हिसेरा पुण्याला पाठवून अहवालाची वाट पाहणे आता बंद होईल, असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र, सध्या केवळ दोन कर्मचाऱ्यांवरच विषशास्त्र विभागाचा कारभार सुरू आहे. कमी मनुष्यबळामुळे पोलिसांनी तेथे पाठविलेल्या व्हिसेराचा अहवाल आठ- नऊ महिने मिळत नाही, अशी स्थिती समोर आली आहे.
सोलापुरातील लघू न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे दरमहा धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील ७० व्हिसेरा यायचे. सोलापुरातील या प्रयोगशाळेत विषशास्त्र व जीवशास्त्र असे दोन विभाग आहेत. अपघात, नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीसाठी तर एखाद्या गंभीर गुन्ह्यात मृत्यू झालेल्यांचा अहवाल न्यायालयात चार्जशीट दाखल करताना व्हिसेरा अहवाल आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी महत्त्वाचा असतो.
मात्र, सोलापुरातील लघू न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळेकडून अहवाल मिळायला किमान चार ते नऊ महिने लागत असल्याने पुढील कार्यवाही वेळेत होत नाही, अशीही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी सहायक रासायनिक विश्लेषक, प्रयोगशाळा परिचर व तंत्रज्ञ यांची एक टीम असते. सोलापूरच्या लॅबमध्ये तीन टीम आवश्यक आहेत, पण सध्या एक कंत्राटी कर्मचारी घेऊन अन्य दोघांवर विषशास्त्र विभागाचा कारभार सुरू आहे. मनुष्यबळ वाढीची मागणी करून, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याचेही तेथील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मुलाच्या मृत्यूनंतरही मिळेना शासकीय मदत
मुसळधार पावसामुळे कासेगावच्या (ता. द. सोलापूर) ओढ्याला पाणी आले होते. गावाकडे दुचाकीवरून जाणाऱ्या लक्ष्मण संभाजी कदम या तरुणाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि १२ जून रोजी तो दुचाकीसह वाहून गेला. १४ जूनला त्याचा मृतदेह सापडला. त्या दिवशी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन झाले. तेव्हापासून त्याच्या व्हिसेराचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्तीतून शासकीय मदत मिळालेली नाही. हॉस्पिटलवाले व्हिसेरा रिपोर्ट आल्यावर मृत्यूचे नेमके कारण अहवालात देता येईल म्हणतात, तर पोलिस सांगतात, की फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून आला नाही.
मृताचा व्हिसेरा पोलिसांच्या माध्यमातून फॉरेन्सिक लॅबला पाठविला जातो
रुग्णाच्या मृत्यूनंतर आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून मृताचा उत्तरीय तपासणी अहवाल तातडीने दिला जातो. मृताचा व्हिसेरा पोलिसांच्या माध्यमातून फॉरेन्सिक लॅबला पाठविला जातो. मात्र, रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यावरच स्पष्ट होते. त्यानंतर त्याची नोंद करून तो अंतिम अहवाल पोलिसांना दिला जातो.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
धाराशिवचे अहवाल आता संभाजीनगरकडे
सोलापूरच्या लघू न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे सुरवातीला धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील मृतांचे व्हिसेरा पाठविले जायचे. पण, १ ऑगस्टपासून धाराशिव जिल्ह्यातील मृतांचे व्हिसेरा आता संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविले जात आहेत. कारण, सोलापूरच्या प्रयोगशाळेत मनुष्यबळ खूपच कमी असून त्यांना वेळेत अहवाल देणे शक्य होत नव्हते.
लॅबवाले म्हणतात, अपर पोलिस अधीक्षकांचे पत्र आणा
मृत व्यक्तीचा व्हिसेरा अहवाल दोन महिन्यांनंतरही येत नसल्याने काही रुग्णांचे नातेवाईक सोलापुरातील फॉरेन्सिक लॅबला जाऊन आले. त्यावेळी अहवालासाठी आणखी तीन-चार महिने लागतील, असे सांगण्यात आले. पण, अहवाल काही दिवसांत हवा असल्यास अपर पोलिस अधीक्षकांचे पत्र आणून द्यावा लागेल, असा सल्लाही लॅबमधील अधिकाऱ्यांनी ‘त्या’ नातेवाइकांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.