पुणे विभागात १३ लाख टन, सोलापूर विभागात १५ लाख टन, नगर विभागात साडेनऊ लाख टन ऊस गाळप झाला आहे.
कोल्हापूर : यावर्षीचा साखर हंगाम राज्यात धुमधडाक्यात सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांची (Sugar Factory) धुरांडी बंद असून गेल्या २० दिवसांत जिल्ह्यात २२ पैकी ६ कारखानेच दबकतच सुरू असून त्यांनी केवळ दोन लाख सहा हजार टन ऊस गाळप केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची (Raju Shetti, Swabhimani Shetkari Sanghatana) धग कोल्हापुरात कायम असल्याचा परिणाम हंगामावर झाला असून हे आंदोलन कधी मिटणार या विवंचनेत कारखानदार, ऊस उत्पादक आहेत. राज्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’ने सप्टेंबरपासूनच आंदोलनाला सुरुवात केली होती.
गेल्या हंगामातील अतिरिक्त प्रतिटन ४०० रुपये व यावर्षी एकरकमी प्रतिटन ३५०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील ऊसतोडणी बंद करण्यात आली असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नुकसान करणे, त्यांची तोडफोड करणे असे प्रकार सुरू आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने झालेली बैठकही निष्फळ ठरली.
एकीकडे राज्यात हंगाम सुरळीत सुरू असताना गेली अनेक वर्षे एकरकमी एफआरपी देणाऱ्या, काही वेळा एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेल्या या जिल्ह्यात संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम ठप्प आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २२ कारखाने आहेत. यापैकी केवळ सहा कारखाने दबकतच सुरू आहेत, उर्वरित कारखाने पूर्णपणे बंद आहेत.
पुणे विभागात १३ लाख टन, सोलापूर विभागात १५ लाख टन, नगर विभागात साडेनऊ लाख टन ऊस गाळप झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांची मिळून दैनंदिन गाळप क्षमता ९६ हजार मेट्रिक टन आहे; पण अवघ्या २० ते २५ हजार टनच उसाचे गाळप होत आहे. दरवर्षी एफआरपीपेक्षा काही ना काही रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांत तर गेल्या २० दिवसांत उसाचे कांडेही गाळप झालेले नाही.
साखर उद्योगासाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. बॉयलर पेटला, टोळ्या आल्या, हंगामी कर्मचारी हजर झाले. मात्र, हंगामच सुरू नसल्याने कारखान्यांवर पुन्हा अर्थिक बोजा पडत आहे. यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांतून होत आहे.
सहकारी खासगी
कोल्हापूर ११ ६ ६.७३
पुणे १२ ७ १३.४९
सोलापूर १३ २२ १५.३८
नगर ९ ८ ९.५५
औरंगाबाद ११ ८ ६.५
नांदेड ७ १७ ९.१२
अमरावती २ ०.९६
साखर आयुक्तांकडील १६ नोव्हेंबरच्या अहवालापर्यंत कोरे-वारणानगर, पंचगंगा-इचलकरंजी, कुंभी-कुडित्रे, दूधगंगा-बिद्री, भोगावती-परिते, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, जवाहर-हुपरी, राजाराम-बावडा, आजरा, दत्त-दालमिया, गुरुदत्त-टाकळीवाडी या कारखान्यांत एक टनही उसाचे गाळप अद्याप झालेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.