Sugarcane Cutting Rate : ऊस तोडणीच्या मजुरीत प्रति टन ९३ रुपयांची वाढ; शरद पवार, पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीने तोडगा

राज्यातील ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीसाठीच्या प्रचलित मजुरी दरात ३४ टक्के वाढ देण्यास राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने गुरुवारी (ता.४) झालेल्या बैठकीत होकार दिला.
sugarcane cutting
sugarcane cuttingsakal
Updated on

पुणे - राज्यातील ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीसाठीच्या प्रचलित मजुरी दरात ३४ टक्के वाढ देण्यास राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने गुरुवारी (ता.४) झालेल्या बैठकीत होकार दिला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांच्या मध्यस्थीनंतर ऊस तोडणी मजुरी दरावर आज तोडगा निघाला.

यामुळे ऊसतोड मजुरांना ऊस तोडणीसाठी आता प्रति टन ३६७ रुपये मजुरी मिळणार आहे. दरम्यान, ही दरवाढ चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरु झालेल्या दिवसापासून पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार आहे.

प्रचलित दरानुसार ऊसतोड कामगारांना प्रति टन २७४ रुपये मजुरी मिळत होती. या मजुरी दरात ५० टक्के वाढ करून ती, प्रति टन ४१० रुपये करण्याची मागणी विविध ऊसतोड कामगार संघटनांनी केली होती. मात्र या मागणीसाठीची बैठक निष्फळ ठरल्याने, ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याची घोषणा ऊसतोडणी कामगार संघटनांनी तीन आठवड्यांपूर्वी केली होती.

मात्र कामगार संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखाना महासंघाचे याबाबतचे सर्व मुद्दे बाजूला ठेवत प्रति टन ९३ रुपयांची वाढ करण्याचा तोडगा पवार आणि मुंडे यांनी सुचविला. हा तोडगा सर्वांनी मान्य केला. यामुळे आता ऊसतोडणी मजुरांना ऊस तोडणीसाठी प्रति टन २७४ रुपयांऐवजी ३६७ रुपये मजुरी मिळणार आहे.

ऊसतोडणीच्या मजुरी दरात किमान ५० टक्के वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊसतोडणी, वाहतूक कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, त्यामध्ये तोडगा निघत नसल्याने ऊसतोड कामगारांनी ‘कोयता बंद’ आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे ऊस तोडणीचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे पी. आर. पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील व हर्षवर्धन पाटील, ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कराड यांच्यासह ऊसतोडणी कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंकजा मुंडेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर बैठक घेऊन तोडगा काढल्याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष आभार मानले. याशिवाय दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामकाजाबाबत त्यांनी असमाधानही व्यक्त केले.

या महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या हिताचे काम झाले पाहिजे. कामगारांचा विम्याचा प्रश्न, त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, यासाठी निर्वाणीचा इशारा देणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.