पुणे - राज्यातील ऊस तोडणी मजुरीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ऊस तोडणी मशिन मालकांनी मशिनने केल्या जाणाऱ्या उसाच्या तोडणीसाठी प्रति टन ७०० रुपये दर देण्याची मागणी महाराष्ट्र ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने केली आहे.
या मागणीसाठी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास, येत्या २० जानेवारीपासून मशिनद्वारे केली जाणारी ऊस तोडणी बंद करण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात मशिनने ऊस तोडणी करण्यासाठी दर वेगवेगळे आहेत. मुळात हे दर संपूर्ण राज्यभरात एक समान असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात हे दर एक समान केले जात नाहीत आणि दरवाढसुद्धा दिली जात नाही. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने, सध्याच्या दरात मशिनद्वारे ऊस तोडणी करणे परवडत नाही.
याशिवाय वाहतूक दरातसुद्धा वाढ जाहीर केली जात नसल्याने नाईलाजाने बेमुदत ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महाराष्ट्र ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी पुलकुंडवार यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे.
कृषी क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजनांमुळे कृषी यांत्रिकीकरणात वेगाने वाढ झाली आहे. यानुसार सध्या महाराष्ट्रात सुमारे १ हजार २०० ऊस तोडणी मशिन कार्यरत आहेत. या सर्व मशिन शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शेतीसाठी पूरक जोडधंदा म्हणून शेती व घरावर कर्ज काढून घेतलेल्या आहेत.
मात्र राजकीय सोईसाठी सर्व पुढाऱ्यांनी या तरुणांचा फक्त वापर करून घेतला असून, केवळ वेळोवेळी फसवी आश्वासने देऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी फसवणूक केली असल्याचा आरोप साळुंखे यांनी यावेळी केला. संजय साळुंखे यांच्यासह अमोलराजे जाधव, गणेश यादव, किशोर जगदाळे, नीलेश बगते आदींनी पुलकुंडवार यांना निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजगोंडा पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.