Summer Youth Summit 2024 : विकसित भारतासाठी ध्येय निश्चित करा; उदय सामंत यांचे युवकांना आवाहन

विकसित भारताची संकल्पना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांबरोबरच युवा पिढीची देखील आहे.
Uday Samant
Uday Samantsakal
Updated on

पुणे - ‘विकसित भारताची संकल्पना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांबरोबरच युवा पिढीची देखील आहे. त्यामुळेच युवा पिढी ज्या ज्या क्षेत्रांत काम करेल, त्या-त्या क्षेत्रांत त्यांनी समरस होऊ चांगले काम केले पाहिजे. देश बलशाली करायचा असेल, तर निर्णय घेऊन त्यावर ठाम असायला हवे. म्हणूनच युवकांनी ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल केली पाहिजे,’ असा कानमंत्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन समर युथ समिट’ या दोन दिवसीय शिबिराचे उद्‌घाटन मंगळवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. या उद्‌घाटनप्रसंगी सामंत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. या वेळी माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख राणा सूर्यवंशी, ट्रिनिटी ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संचालक हर्षदा जाधव, फ्रेमबॉक्स ॲनिमेशनच्या अध्यक्ष विनिता बच्छानी, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘निवडणूक ही लोकशाहीतील एक प्रक्रिया आहे. जिंकणे आणि हरणे हा त्यातील एक भाग आहे. जिंकल्यानंतर मस्तीत न जाणे आणि हरल्यानंतर खचून न जाणे, अशी वृत्ती राजकारण्यांमध्ये असली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाही मजबूत करण्याचे काम करत असतात. राजकारण्यांसह विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींकडून नम्रता, नेतृत्वगुण हे तरुणांनी शिकायला हवे.

नेतृत्वगुण विकसित करताना करण्याची आणि शिकण्याची प्रवृत्ती असायला हवी. ‘आमदाराच्या मुलाने आमदार आणि मंत्र्याच्या मुलाने मंत्री व्हावे,’ अशी मक्तेदारी नाही. प्रतिभावान युवकांनी नेतृत्व, सेवा करण्यासाठी पुढे यावे, संधीचे सोने करावे.’

फडणीस म्हणाले, ‘युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावा, या उद्देशाने ‘यिन’च्या व्यासपीठावरून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील नेतृत्वांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. तरुणांसमोर चांगले आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न ‘यिन’च्या माध्यमातून करण्यात येतो.’

‘यिन समर युथ समिट’ हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या कार्यक्रमासाठी के. जे. कॉलेज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, महाएनजीओ फेडरेशन, एआयएसएसएम सोसायटी, एसएस मोबाईल्स आणि फ्रेमबॉक्स ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचे विशेष सहाकार्य लाभले आहे. सूत्रसंचालन भूषण करंदीकर आणि आरजे आरव यांनी केले.

युवा हेच भारताचे ब्रॅंड ॲम्बेसिडर

‘विकसनशील देशाकडून भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना, मोठ्या योजना आणि प्रकल्पांची आखणी, परकीय गुंतवणूक, आरोग्य, उच्च शिक्षणाला महत्त्व असेल. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व दिले जात असून शिक्षणाच्या माध्यमातून देशातील तरुणांना ‘उत्तम कामगिरी करणारी मालमत्ता’ म्हणून तयार केले जात आहे. युवक हे विकसित भारताचे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर आहेत. युवकांमधूनच विकसित भारत जगाला दिसणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून (एनईपी) पुढील २५ वर्षांत युवकांना उद्योजक आणि कुशल मनुष्यबळ म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये कौशल्य निर्माण व्हावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी ‘एनईपी’चा मोकळ्या मनाने स्वीकार करायला हवा. एनईपीमुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होतील,’ असा विश्वास डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केला.

‘यिन’च्या माध्यमातून युवकांना अराजकीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मागची पिढी म्हणते, पुढच्या पिढीत उणिवा आहेत. परंतु, आजच्या पिढीसमोर इंटरनेटमुळे एक लाख प्रलोभने आहेत. यातून मात करत आपल्या आयुष्याची वाट सुकर करणे, हे आव्हान आजच्या पिढीसमोर आहे. आजच्या पिढीला दोष दाखवणे सोपे आहे.

परंतु आजची पिढी कोणत्या मानसिकतेतून जात आहे, याचा विचार करणे अपेक्षित आहे. तरुणांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत, त्या शोधल्या पाहिजेत. निर्णय योग्य पद्धतीने घेऊन, त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. संकटांना आव्हान समजून सामोरे जाणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्कृष्टता कशी मिळविता येईल, याचा प्रयत्न तरुणांनी केला पाहिजे.

- सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com