सोलापूर : २७ जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीवेळी शहरातील नऊ हजार ८१६ जणांना शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्याबद्दल समन्स बजावले होते. त्यातील तीन हजार १४५ वाहनचालकांनी अंदाजे सव्वाकोटींचा दंड भरून पुढील कारवाई टाळली होती. आता २८ सप्टेंबरला होणाऱ्या लोकअदालतीपूर्वी शहर पोलिसांनी १३ हजार बेशिस्त वाहनचालकांना समन्स बजावले आहे. त्यांना आता वाहनांवरील दंड भरून पुढील न्यायालयीन कारवाई टाळावी लागणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्हाभरातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत पार पडणार आहे. २०२४ या वर्षातील ही तिसरी राष्ट्रीय लोकअदालत आहे. ज्यांना या लोकअदालतीच्या अनुषंगाने समन्स, नोटीस प्राप्त झाली आहे, त्या सर्वांना २८ सप्टेंबरला न्यायालयात येऊन तडजोडीने ते प्रकरण मिटविता येणार आहे.
लोकअदालतीत फौजदारी तडजोडपत्र प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, कलम ३८ एन.आय. ॲक्टची प्रकरणे, अपघात प्राधिकरणाकडील प्रकरणे, कामगार वाद, वीज व पाणी देणेबाकीची प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन मोबदला, तसेच बॅंक, सहकारी बॅंका, पतसंस्थांच्या वसुलीची दरखास्त, बॅंक लवाद दरखास्त अशा प्रकरणांचा समावेश असतो. या लोकअदालतीत समक्ष हजर राहण्यास अडचणी असल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील उपस्थित राहण्याची सोय आहे.
वाहतूक नियम मोडल्याचा दंड कोठे भरायचा?
बेशिस्त वाहनचालकांना शहर पोलिसांनी ‘एसएमएस’द्वारे पाठविलेल्या नोटीसवर एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करून दंडाची रक्कम भरता येते. याशिवाय महा-ट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून किंवा सोलापूरसह राज्यातील कोणत्याही वाहतूक शाखेत अथवा वाहतूक अंमलदारांकडील मशिनद्वारे दंड भरण्याची सोय आहे. दंड भरल्यावर पुढील संभाव्य कारवाई टळते.
समन्स बजावलेल्यांना दंड भरावा लागेल
२८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. या अनुषंगाने शहरातील जवळपास १३ हजार बेशिस्त वाहनचालकांना त्यांच्या वाहनांवरील दंड भरण्यासंदर्भातील समन्स बजावले आहे. त्या सर्वांनी कारवाई टाळण्याऐवजी दंडाची रक्कम भरून घ्यावी.
- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.