राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार याचा आज (मंगळवार) वाढदिवस आहे. पवारांच्या ८३व्यावाढदिवसानिमीत्त राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
वयाची त्र्याऐंशी वर्ष पुर्ण करत असलेले शरद पवार अद्यापही राजकारणात सक्रिय आहेत. काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार रस्त्यावर उतरले होते. याची आठवण करून देत "कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे." असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यासोबतच "मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे." असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट आहे तशी....
"आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.