सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने डोळ्यांची जळजळ, डोळे कोरडे पडतात. त्यामुळे सकाळी साडेदहानंतर शक्यतो बाहेर पडू नये. डोळ्यावर चष्मा, डोक्यावर टोपी वापरावी. उलटी, जुलाब, तापाचे रुग्ण वाढले असून त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घाम शोषला जाईल, असे कपडे न घालता सैल, फिक्कट रंगाची कॉटनचे कपडे घालावेत. रस्त्यावरील उघउे पदार्थ, तळलेले पदार्थ, घरातील शिल्लक अन्न खाणे टाळावे. लहान मुलांना लिंबुशरबत, काकडी, कलिंगड, द्राक्ष, टरबूज अशी पाणीयुक्त फळे खायला द्यावीत. किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली सिरशेट्टी यांनी सांगितले. मागील काही दिवसात तापमान 37 अंशावरून 41 अशांवर पोहचले आहे. रस्ते सिमेंट, डांबरीचे झाल्याने आणि एसीमुळे विषारी वायू हवेत मिसळत असल्याने गरम वाफा वाढत आहेत. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, त्वचा व डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आजारी पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
अशी घ्या, त्वचेची काळजी...
कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा भाजणे, ऍलर्जीमुळे त्वचेवर पुरळ उठणे, सतत उन्हात गेल्याने त्वचेचे वय वाढलेले दिसणे आणि काही प्रकारचे त्वचेचे कॅन्सर उद्भवतात. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करावा. वय, त्वचेचा प्रकार, उन्हात जाण्याचा कालावधी व कामाच्या स्वरुपावरून त्याची निवड करावी. कोरड्या त्वचेसाठी क्रीम अथवा लोशनचा स्वरुपात सनस्क्रीन वापरावे. तेलकट त्वचा किंवा मुरमं येण्याच्या वयात जेल स्वरूपातील सनस्क्रीन वापरावे. लहान मुलांसाठी फिजिकल सनस्क्रीन म्हणजेच केमिकलविरहित सनस्क्रीन जास्त योग्य ठरते. पोहताना वापरण्याचे सनस्क्रीन वॉटरप्रूफ असावे. काही व्यक्तींना अयोग्य सनस्क्रीनचा वापर केल्याने पुरळ किंवा मुरूम उठण्याची ऍलर्जी होते. त्यामुळे घरातील सर्वजण एकच सनस्क्रीन वापरु शकतात, असे नाही. कोणाच्या तरी ऐकण्याने उपचार घेऊ नका, त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत. उन्हाने त्वचा काळवंडली असल्यास सनस्क्रीनचा वापर करण्याबरोबरच काही स्किन लायटनिंग क्रिम म्हणजेच त्वचेचा काळपटपणा कमी करणाऱ्या क्रिमचा वार करता येईल. सनबर्न म्हणजेच उन्हामुळे त्वचा भाजली असल्यास काही दिवस ऊन पूर्णपणे टाळावे. उन्हामुळे त्वचेचे वय वाढल्यासारखे वाटत असल्यास अल्लु रॉनिक ऍसिड ग्लायकोलिक ऍसिड रेटिनोल याचा वापर करता येईल. तसेच केमिकल पिलिंगसारख्या काही ट्रिटमेंटचाही वापर करावा, असे आवाहन त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती खटावकर यांनी केले आहे.
डॉ. वैशाली सिरशेट्टी म्हणाल्या...
- ज्येष्ठ नागरिकांनी साडेदहा ते साडेचार या वेळेत घराबाहेर पडू नये
- घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री, डोळ्यावर चष्मा किंवा गॉगल वापरावा
- उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पाणीयुक्त पदार्थ खावेत
- लहान मुलांना उलटी, जुलाब, ताप येतोय, त्यांना लिंबुशरबत, काकडी, कलिंगड, टरबूज खायला द्यावेत
- रस्त्यावरील उघडे पदार्थ खाऊ नयेत, थंड पेय्य किंवा पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नयेत
- दररोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे; पाण्याची बाटली घरातूनच घेऊन जावी
- गर्भवती महिलांनी तळलेले पदार्थ खाऊ नयेत, शिळे शिल्लक अन्न न खाता ताजे पदार्थ खायला हवेत
- बाहेरून घरी आल्यानंतर दहा मिनिटे शांत बसा, त्यानंतर हातपाय स्वच्छ करून पुढील कामे करावीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.