मुंबई - आगामी निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांकडून मतांसाठी देण्यात येणारे पैसे घ्या, परंतु मतदान मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच करा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. ‘निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून वाटण्यात येणारे पैसे हे जनतेचे म्हणजे तुमचेच आहेत.
तुमच्याकडून ओरबाडलेले पैसेच तुम्हाला देत आहेत. ते पैसे नक्की घ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा,’ असे राज ठाकरे म्हणाले. नुकतेच निधन झालेले उद्योगपती रतन टाटा यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
‘खासदार, आमदार फोडायचे. एकाबरोबर निवडणूक लढवायची, मग निवडून आल्यावर विचारांशी प्रतारणा करून दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेत यायचं हेच मागील पाच वर्षे चालले आहे. सरळ, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे की फोडाफोडी करणारे हवेत ते ठरवा’, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.
‘आज राज्यातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद होणार हे विसरू नका, असा इशारा देताना अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती, कोणालाही कसलीही निष्ठा राहिली नाही. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, असे सांगताना दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणांची त्यांनी खिल्ली उडविली.
ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखं वाघनखं, इथून अब्दाली आला, तिथून शाहिस्तेखान आला, तिकडून अफजलखान आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोला.’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘पुष्पा’ उल्लेख करत ते म्हणाले, 'पुष्पाचे वेगळेच चालले आहे. एकनाथ शिंदे ‘मै आया है’ असे म्हणत दाढीवर हात फिरवितात. मी असा महाराष्ट्र कधीही पाहिलेला नाही. कोणामुळे निवडून आलात? कुणी तुम्हाला मतदान केले? कशासाठी मतदान केले? अशा प्रकारची विचारधारा मी महाराष्ट्रात पाहिलेली नाही. हे काय चाललं आहे, हेच कळत नाही.’
एवढे पक्षांतर कसे करता?
एखादा नेता आता राष्ट्रवादी आहे, मग ठाकरे गटात जाईल किंवा ‘तुतारी’कडेही जाऊ शकतो तिथून आपल्याकडे येऊ शकतो, असे मला एकजण म्हणाला. यांच्या घरातले लोक तरी यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जाऊ देतात, हेच कळात नाही. भावी पिढ्यांवर आपण काय संस्कार करतोय, महाराष्ट्र कोणत्या वाटेने नेत आहोत, असे काही प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले.
#ElectionWithSakal
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.