सोलापूर : शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत (कोप्टा) बंदी आहे. तरीदेखील शाळांबाहेर खुलेआम मावा, गुटखा विक्री होतो. त्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.६२) जिल्हाभर विशेष मोहीम राबवून तब्बल ४७५ टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कोप्टा कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच व्यापार, वाणिज्य, नियमन आणि उत्पादन व पुरवठा, वितरणावर देखील बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः शाळांमधील मुलांना व्यसनाची सवय लागू नये या हेतूने शाळांच्या १०० मीटर अंतरात अशा पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे.
सोलापूर शहरात या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे आणि राजरोसपणे सुरुच आहे. पण, आता ग्रामीणमध्ये सातत्याने अशी विशेष मोहीम राबवून त्या टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी २५ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याची सुरवात (बुधवारी) झाली.
सर्व पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी शाळा व त्यांच्या हद्दीतील पान टपऱ्यांवर कारवाई केली. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड (एकूण ९० हजार रुपये) देखील त्यांच्याकडून वसूल केला. आता शाळा परिसरासह प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पानटपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
कारवाईत मागे, तर कारणे द्यावी लागतील
अनधिकृतपणे शाळांच्या परिसरात पानटपऱ्या टाकून त्याठिकाणी मावा, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटची विक्री करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. यापुढे अशी मोहीम त्या त्या तालुक्यात दरमहा राबविली जाणार आहे. त्यावेळी कारवाईत मागे राहिलेल्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास त्याची कारणे द्यावी लागतील, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
तरूणांच्या भविष्यासाठी विशेष मोहीम
शाळांमधील चिमुकली ही देशाचे भविष्य आहेत. महाविद्यालयीन तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आता शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मावा, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह सिगारेटची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. तसे आदेश सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सातत्याने त्यासंदर्भात विशेष मोहीम राबविली जाईल.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.