अनफिट वाहन चालकांची चिंता वाढली! फिटनेस संपलेल्या वाहनांसाठी भरावा लागेल 2016 पासून विलंब शुल्क; ...तर चौथ्या कारवाईत ‘ही’ वाहने जाणार स्क्रॅपमध्येच

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आठ वर्षानंतर दोन वर्षांसाठी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून त्या वाहनाची पडताळणी होते. प्रवासी किंवा माल वाहतुकीसाठी ते वाहन सुस्थितीत आहे की नाही हे त्यावेळी निश्चित केले जाते.
automobile Industry
automobile Industry Esakal
Updated on

सोलापूर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर मुदतीत त्याचे नूतनीकरण करून न घेणाऱ्या वाहनाला प्रतिदिन ५० रुपयांचे विलंब शुल्क आकारले जात आहे. पण, उच्च न्यायालयात दाखल दोन याचिकांमुळे अनेकांनी विलंब शुल्क भरण्यासाठी निकालाची वाट पाहिली. पण, न्यायालयाने दोन्ही याचिका निकाली काढत तो आदेश बरोबरच असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आता अनफिट वाहनांना २०१६ पासूनच विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आठ वर्षानंतर दोन वर्षांसाठी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून त्या वाहनाची पडताळणी होते. प्रवासी किंवा माल वाहतुकीसाठी ते वाहन सुस्थितीत आहे की नाही हे त्यावेळी निश्चित केले जाते. त्यानुसार त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. फिटनेस प्रमाणपत्रासाठी केवळ ६०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. मात्र, अनेकांनी वाहनाचे योग्यता किंवा फिटनेस प्रमाणपत्र काढून घेतलेले नाही. त्यांना आता २०१६ पासून विलंब शुल्क (दररोज ५० रुपयांप्रमाणे) भरावे लागणार आहे. अनफिट वाहनांमुळे रस्ते अपघातात प्रचंड वाढ झाली असून अपघाती मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता अशा अनफिट वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन ‘आरटीओ’कडून सुरू आहे.

वाहनांच्या ‘फिटनेस’चा निकष

  • नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची लाइफ आठ वर्षांपर्यंत असते. त्यामुळे आठ वर्षांपर्यंत फिटनेस प्रमाणपत्र लागत नाही.

  • आठ वर्षांची मुदत संपल्यानंतर त्या वाहनाला पुढच्या दोन वर्षांसाठी एकदाच फिटनेस प्रमाणपत्र मिळते.

  • दहा वर्षे झालेल्या वाहनांना दरवर्षी फिटनेस (वाहनाची सुस्थिती तपासणी) प्रमाणपत्र काढावेच लागते.

  • फिटनेस संपल्यानंतरही त्याचे नूतनीकरण न करणाऱ्यांना प्रतिदिन ५० रुपयांचे विलंब शुल्क भरावेच लागते.

...तर चौथ्या कारवाईत वाहन स्क्रॅपमध्येच

वाहनाचा फिटनेस संपल्यानंतर संबंधित वाहन मालकाने त्या वाहनाची योग्यता चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. पण, त्या वाहनाचा फिटनेस संपलेला असतानाही अनफिट वाहन रस्त्यांवरून चालवत असल्याने दंडात्मक कारवाई होईल. पहिल्यांदा चार हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा सहा हजार आणि तिसऱ्या कारवाईत आठ हजार रुपयांचा दंड केला जातो. तीनवेळा कारवाई करूनही त्या वाहनाचा फिटनेस करून घेतला नसल्यास चौथ्या कारवाईत ते वाहन जप्त करून स्क्रॅपमध्येच आणले जाते.

अनफिट वाहनांवर होईल दंडात्मक कारवाई

फिटनेस संपलेल्या वाहनांसाठी दररोज ५० रुपयांचे विलंब शुल्क आकारले जात आहे. ज्या वाहनांचा फिटनेस संपला आहे, त्यांनी मुदतीत त्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय त्या वाहनाचा विमा काढता येत नाही. अनफिट वाहने रस्त्यांवर दिसताच आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.

- अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ कार्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.