सोलापूर : शहरातील न्यू पाच्छा पेठ, विजापूर वेस, जेलरोड पोलिस ठाणे परिसरात चार मजली इमारतींना परवानगी असताना त्याठिकाणी अनेकांनी सहा ते आठ मजली इमारती उभारल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृह परिसरात दोन उंच इमारती उभारल्या असून त्यातून तुरुंगातील कैदी दिसतात. या इमारतींची उंची कमी करावी व त्यांचे बांधकाम नियमानुसार आहे का, यासंदर्भात तुरुंग प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी अधिकारात नसतानाही अनेकांना बनावट बांधकाम परवाने दिले आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पण, २०२१ व २०२२ या दोन वर्षांत अंदाजे २५०हून अधिक जणांना अशाप्रकारे बांधकाम परवाने दिल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्याची आता पडताळणी सुरू झाली आहे.
दुसरीकडे न्यू पाच्छा पेठ, विजापूर वेस, जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेकांनी उंच इमारती उभारल्या असून त्याठिकाणी केवळ तीन मीटरचाच रस्ता असल्याचीही बाब समोर आली आहे. इमारत पडल्यास त्याठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी स्थिती तेथे आहे. त्या इमारतींना आता कोणी परवानगी दिली? बांधकाम परवानगी देताना नियम डावलण्यात आले आहेत का? नेमकी परवानगी किती बांधकामासाठी होती? व प्रत्यक्षात किती बांधकाम झाले आहे, या सर्व बाबींची आता पडताळणी सुरू झाल्याचेही सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुंठेवारीला अजून परवानगी नाही, भूमिअभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार
अधिकार नसताना बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आता आणखी किती जणांना असे परवाने दिले आहेत, याची पडताळणी सुरू आहे. दुसरीकडे जागेचा मोजणी नकाशा व मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे असल्याशिवाय गुंठेवारीस परवानगी दिली जात नाही. मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.
- मनीष भिष्णूरकर, उपसंचालक, नगररचना, सोलापूर महापालिका
गुंठेवारीला परवानगी बंद, तरी ‘हद्दवाढ’मध्ये बांधकामे
गुंठेवारीला परवानगी देण्याचा विषय मोजणी नकाशा व मालकीसंबंधीच्या कागदपत्रांमुळे रखडला आहे. भूमिअभिलेख कार्यालयाने मोजणी केल्यानंतर जागेची नेमकी माहिती महापालिकेला समजणार आहे. त्यामुळे वैयक्तिक प्लॉटधारकांना देखील परवानगी देणे बंद आहे. महापालिकेने सिटी सर्व्हे कार्यालयास दिलेली रक्कम, त्यांच्याकडून झालेले काम, याची माहिती मागविली आहे. दरम्यान, गुंठेवारीला परवानगी बंद असतानाही शहराच्या चहूबाजूला बांधकामे दिसत आहेत. अनेकांनी जागा घेतली, पण त्याची अधिकृत मालकी त्यांना मिळालेली नाही. हद्दवाढमध्ये नव्याने बांधकाम झालेल्यांकडून टॅक्स भरला जातोय का? परवाना नसताना त्यांनी बांधकामे केली आहेत का? याचा शोध महापालिका कधी घेणार का? असा प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.