नाशिक : सद्यःपरिस्थिती अस्वस्थ करणारी असून, ती देशाला ‘फॅसिझम’कडे घेऊन जाणारी आहे. केंद्र सरकारने एकीकडे नोटाबंदीचा निर्णय घेऊन अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे, तर दुसरीकडे जीएसटी करप्रणालीचा निर्णय घेतल्याने अर्थव्यवस्थेची वेगाने घसरगुंडी सुरू झाल्याचे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रविवारी (ता. ५) व्यक्त केले.
‘मविप्र’च्या प्रांगणात शनिवार (ता.४)पासून सुरू असलेल्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. मुणगेकर बोलत होते. ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, राजेंद्र बावके, राजेश राऊत, प्रा. प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद आदी उपस्थित होते. बी. एस. खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य संयोजक राजू देसले यांनी आभार मानले. तत्पूर्वी शनिवारप्रमाणेच आजही विविध विषयांवर गटचर्चा, कविसंमेलन, व्याख्यान, बालकला सादरीकरण, परिसंवाद, आदिवासी संस्कृती दर्शन असे विविध कार्यक्रम झाले.
कोरोनामुळे २२ कोटी लोकांचे रोजगार गेले. दर सहा मिनिटांना देशातील कुठल्यातरी भागात बलात्कार होतो. दलितांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत, दिल्लीच्या सीमेवर सातशे शेतकरी आंदोलनामुळे मृत्युमुखी पडले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणताही खेद नसल्याचे सांगून डॉ. मुणगेकरांनी कॅबिनेट केवळ नावाला असून, देशाचा कारभार मोदी व शाह ही जोडीच पाहात असल्याचा आरोप केला. देशाच्या फाळणीला बॅरिस्टर जीनांपेक्षा फॅसिस्ट वृत्तीचे लोक अधिक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू आणि हिंदुत्व या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. देशातील साडेपंधरा कोटी मुस्लिमांचे खच्चीकरण करणे हे हिंदुत्ववाद्यांचे काम असल्याचा आरोपही डॉ. मुणगेकर यांनी केला. देशातील सर्व सत्ता हिंदूंकडेच असूनही मुस्लिमांची भीती घातली जात असल्याचे सांगत त्यांनी पुढील निवडणुका सावरकरांच्या नावावर होतील, असे भाकीत केले. पुढील निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशातील लोकशाही नष्ट होईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
मंथन हीच संमेलनाची उपलब्धी : नीलिमाताई पवार
मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी संमेलनात झालेले विचारमंथन हीच मोठी उपलब्धी असल्याचे सांगत संस्था स्थापन करणाऱ्या कर्मवीरांनी दलित, उपेक्षितांसाठी दिलेले योगदान कथन केले. शिक्षण क्षेत्रातील तत्कालीन धुरिणांची मक्तेदारी शंभर वर्षांपूर्वीच मोडीत काढून पहिला विद्रोह केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने आजवर समता, बंधुता या तत्त्वांचे पालन केल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.