सोलापूर : सोलापूकरांनी दोनवेळा भाजपला खासदारकीची संधी दिली आणि सोलापूर जिल्हा ५० वर्षे पिछाडीवर गेला. जिल्ह्याच्या विकासाची कास असलेल्या नेत्याला तुम्ही पराभूत केले. पण, आता तुम्ही त्यांचा अपमान करणार नसाल तर पुन्हा त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आदींनी दिली. यावेळी पटोले म्हणाले, नुसते सोलापूरच नव्हे तर माढ्याचाही खासदार आपलाच करायचा आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपचा निवडणूक वचननामा कसा तयार होतो, हे सांगितले.
शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिर येथे निर्धार मेळावा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नसिम खान, आमदार भाई जगताप, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रूपनवर, विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, महेश लोंढे, मनीष गडदे, तिरूपती परकीपंडला, भिमाशंकर टेकाळे, वाहिद विजापुरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रास्ताविक करताना चेतन नरोटे यांनी सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरचे नेतृत्व करतील आणि सत्ता आल्यानंतर आम्हाला प्रणिती शिंदेंच्या रूपाने झुकते माप द्या, अशी मागणी केली. तर समोरील काहींनी सुशीलकुमार शिंदेंच आमचे नेते असल्याची घोषणाबाजी केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी त्याची पूर्तता होईल, असे आश्वासन दिले.
प्रा. निंबर्गी यांनी केली भाजपची पोलखोल
भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी निर्धार मेळाव्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपचा वचननामा कसा तयार होतो, यावर स्पष्टच भाष्य केले. ‘कोणी चंद्र जरी मागत असेल, तर त्याला निवडणूक होईपर्यंत देतोच म्हणायचे’ असा वचननामा आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून तयार करायचो असे सांगून प्रा. निंबर्गी यांनी भाजपची पोलखोल केली. आम्ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने प्रेरित होऊन भाजपमध्ये आलो.
पण, आता तो विचार आम्हाला शोधूनही सापडत नाही. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे अनेकजण वैतागले असून मी त्यामळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एक महिला महापौर आपल्याला वरचढ होऊ नये म्हणून पक्षातील त्यांच्याच समाजाच्या भाजप नेत्याने त्यांची अडवणूक कशी केली, यावरही त्यांनी भाष्य केले. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शिंदे साहेबांनी प्रा. निंबर्गी आणि चेतन नराटे यांची जोड चांगली लावली आहे. ग्रामीण भाषेत खिलार जोडच म्हणता येईल, अशी त्यांनी टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.
भाजपचे दोन्ही खासदार बिनकामाचेच
२०१४च्या लोकसभा निवडणुकीतून खासदार झालेले ॲड. शरद बनसोडे हे हातात मोठमोठ्या अंगठ्या घालून लोकसभेत यायचे. सर्वात मागच्या बाकावर निवांत बसायचे. आताचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पोलिस ठाण्याला हजेरी द्यावी लागत आहे. विकासाची कामे कोठेही दिसत नाहीत. पण, आता सोलापूरकरांनी सुशीलकुमार शिंदेंना साथ दिल्यास निश्चितपणे सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
अशोक चौकात ५०० मुला-मुलींचे अभ्यासिका केंद्र
सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरातील पोलिस मुख्यालयाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून दोन मजली इमारत साकारण्यात आली आहे. त्याठिकाणी ५०० मुला-मुलींना ‘एमपीएससी’ व ’युपीएससी’चा अभ्यास करता येणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण रविवारी पार पडले. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पुस्तके, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्याठिकाणी मिळणार आहे. तसेच मराठी पत्रकार संघाजवळील शुभराय आर्ट गॅलरीच्या कामाचे भूमीपूजन देखील पार पडले.
बसायला खुर्ची दिली नसल्याची खंत; कार्यक्रमातून निघून गेले जिल्हाध्यक्ष मोहिते-पाटील
प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या भाषणात बोलताना आगामी काळात पक्षासाठी वेळ देऊन संघटन मजबुतीचे काम करणाऱ्यांनाच पदावर ठेवले जाईल असे यावेळी स्पष्ट केले. पण, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेसकडून नियोजन केले जात आहे. वरिष्ठ नेते राज्यभर दौरे करीत आहेत. पण, काँग्रेसमधील गटबाजी काही संपायला तयार नाही, याचे दर्शन रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिरातील निर्धार मेळाव्यात पाहायला मिळाले.
प्रमुख पाहुणे म्हणजेच मंत्री, आमदारांच्या रांगेत प्रोटोकॉलनुसार जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला बसायला एका कोपऱ्यात खुर्ची मिळाली. पण, आमदार प्रणिती शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर समोरील रांगेत खुर्च्या कमी पडल्या आणि माजी आमदाराला खुर्चीवरून उठाव लागले. पक्षासाठी त्यांचा त्याग, कार्य मोठे असल्याचा रिस्पेक्ट ठेवून धवलसिंहांनी त्यांना स्वत:ची खुर्ची दिली. त्यावेळी धवलसिंहांना दुसरी खुर्ची देणे अपेक्षित होते.
मात्र, थोडावेळ होऊनही तसे काहीच झाले नाही. त्यामुळे उभारलेल्या धवलसिंहांनी कार्यक्रमातून बाहेर जाणेच पसंत केले. बाळासाहेब शेळके यांनी त्यांना हटकले, पण काहीतरी सांगून ते निघून गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, निर्धार त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंहांचे नाव घेतले, पण ते व्यासपीठावरच नव्हते. त्यावेळी व्यासपीठावरील काहींनी बाहेर गेले असून येतील, असा इशारा करून वेळ मारून नेली. काँग्रेस कार्यकर्ते सातलिंग शटगार यांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याची चर्चा होती.
व्यासपीठावर नेमकं घडलं काय?
शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शहराध्यक्ष चेतन नरोटेंची खुर्ची पहिल्या रांगेत होती. तर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे पहिल्याच रांगेत, पण सर्वात शेवटी बसले होते. मात्र, आमदार प्रणिती शिंदे स्टेजवर आल्यानंतर समोरील रांगेत खुर्च्या कमी पडल्या आणि माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांना उभारावे लागले. त्यावेळी धवलसिहांनी त्यांची खुर्ची त्यांना दिली. पण, त्याबदल्यात धवलसिंहांना काहीवेळ खुर्ची मिळालीच नाही. त्यामुळे कार्यक्रमाला सुरवात होत असतानाच धवलसिंह अचानक हुतात्मा सभागृहाबाहेर आले आणि तेथे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्याशी बोलून ते तसेच निघून गेल्याचे पाहायला मिळाले.
...तेथे पण असेच झाले
सकाळी साडेअकरा वाजता होणारा निर्धार मेळावा दुपारी दोन वाजता सुरु झाला. माध्यम प्रतिनिधींसह कार्यकर्ते उपाशीपोटी तसेच हुतात्मा स्मृती मंदिरात बसून होते. तत्पूर्वी, अशोक चौक परिसरातील एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तेथील उपस्थितांना संबोधित केले. पण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाषणाला उठले. पण तेथील कार्यक्रम संपल्याचे समजून व्यासपीठावरील बरेच जण स्टेजच्या खाली आले. पुन्हा नाना पटोलेंचे भाषण होईपर्यंत त्यांना व्यासपीठावर जाऊन बसावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.