सोलापूर : चिंचोली एमआयडीसीत छोटे-मोठे एक हजार १६५ उद्योग आहेत. १९९६ मध्ये चिंचोली एमआयडीसीतील उद्योगांसाठी १० एमएलडी पाणी देण्याचा करार झाला होता आणि महापालिकेने त्यानुसार पाणीपुरवठाही केला. पण, आता उद्योग वाढल्याने पाण्याची गरजही वाढली आहे. त्यामुळे चिंचोली एमआयडीसीला दररोज १५ एमएलडी पाणी द्यावे, अशी प्रमुख मागणी सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनने महापालिकेकडे केली असून त्यावर सकारात्मक मार्ग अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना अपेक्षित जॉब मिळत नाही म्हणून दरवर्षी हजारो तरुण सोलापुरातून दुसरीकडे स्थलांतर करतात ही वस्तुस्थिती आहे. तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी याठिकाणी मोठमोठे उद्योग (उदा. आयटी कंपन्या) यायला हवेत. त्यासाठी पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधा दर्जेदार अपेक्षित आहेत.
उद्योगवाढीसाठी पाण्याची शाश्वती महत्त्वाची आहे. चिंचोलीतील उद्योजक मीटरने पाणी घेतात आणि त्यामुळे पाणी वाया जात नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेची समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर चिंचोलीतील उद्योगांसाठी दररोज १७० एमएलडीतील १५ एमएलडी पाणी मिळावे, एवढीच माफक अपेक्षा उद्योजकांची आहे. त्यावर सकारात्मक कायमस्वरूपी तोडगा निघाल्यास उद्योग वाढतील व हजारो बेरोजगार हातांना आपल्याच जिल्ह्यात जॉब मिळतील हे निश्चित.
जिल्हाधिकारी निश्चितपणे प्रश्न सोडवतील असा विश्वास आहे
चिंचोली एमआयडीसीतील पाण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढला आहे. भविष्यात देखील उद्योजकांच्या अडचणी त्यांच्या माध्यमातून सुटतील, असा विश्वास आहे. उद्योग वाढत असताना त्यांच्या पाण्याची गरजही वाढत असते, त्यानुसार आम्ही महापालिकेकडे मागणी केली आहे.
- राम रेड्डी, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, सोलापूर
-------------------------------------------------------------------------------------
भविष्यात उद्योग वाढल्यावर पाण्याची गरजही वाढणार आहे
२५-३० वर्षांपूर्वीचा चिंचोली एमआयडीसीतील उद्योगांसाठी १० एमएलडी पाणी देण्याचा करार झाला. पण, आता १५ एमएलडी पाण्याची मागणी असून तसे महापालिकेला पत्राद्वारे कळविले देखील आहे. भविष्यात उद्योग वाढल्यावर पाण्याची गरजही वाढणार आहे. विमानसेवा सुरू झाल्यावर निश्चितपणे आणखी उद्योग वाढतील, त्यादृष्टीने नियोजन आताच करावे लागेल.
- गणेश सुत्रावे, उपाध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, सोलापूर
------------------------------------------------------------------------------------------------
पाण्याचे कायमस्वरुपी ठोस नियोजन अपेक्षित आहे
चिंचोलीतील एमआयडीसीला १० एमएलडी पाणी देण्याचा करार खूप वर्षांपूर्वीचा आहे. काही वर्षांत याठिकाणी उद्योग वाढले आहेत. त्यामुळे उद्योगांसाठी पाण्याची गरजही वाढली आहे. भविष्यात विमानसेवा सुरू झाल्यावर आणखी उद्योग वाढतील, त्यामुळे भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन अपेक्षित आहे.
- वासुदेव बंग, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, सोलापूर
-------------------------------------------------------------------------------------
विमानसेवा सुरू झाल्यावर निश्चितपणे आणखी उद्योग वाढतील
बिस्किट बनविण्याच्या उद्योगासह इतरही उद्योगांना पाणी खूप लागते, त्यामुळे उद्योजकांना पाण्याची शाश्वती आवश्यक असते. सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यावर याठिकाणी निश्चितपणे आणखी उद्योग वाढतील. अशावेळी उद्योजकांना पाण्याची शाश्वती झाल्यास कशाचीही चिंता राहत नाही.
- ऋषिकेश अत्रे, सृजन फूड्स, उद्योजक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.