२ वर्षांच्या बाळाला वाचवून आईने सोडला प्राण! कारच्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू; दुचाकीवरून पडताना छातीशी कवटाळून धरल्याने बाळ सुखरूप

नवीन घराचे बांधकाम पाहून पती व मुलासोबत दुचाकीवरून घरी येताना कारने धडक दिली. झालेल्या अपघातात लक्ष्मी रमेश कुंभारीकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून पडताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय बाळाला छातीशी कवटाळून धरले. स्वतः मागे डोक्यावर पडल्यानंतरही त्यांनी बाळाला न सोडल्याने त्याचा जीव वाचला.
Accident
Accidentsakal
Updated on

सोलापूर : नवीन घराचे बांधकाम पाहून पती व मुलासोबत दुचाकीवरून (एमएच १३, बीजे ३०२१) घरी येताना कारने धडक दिली. झालेल्या अपघातात लक्ष्मी रमेश कुंभारीकर (वय ३४, रा. जंगम वस्ती) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून पडताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय बाळाला छातीशी कवटाळून धरले. स्वतः मागे डोक्यावर पडल्यानंतरही त्यांनी बाळाला न सोडल्याने त्याचा जीव वाचला. अक्कलकोट रोडवर ही घटना घडली.

फिर्यादी रमेश विजयकुमार कुंभारीकर हे २४ ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास पत्नी लक्ष्मी व दोन वर्षाच्या आपल्या मुलाला घेऊन जंगम वस्तीत सुरू असलेल्या घराचे बांधकाम पाहायला दुचाकीवरून गेले होते. बांधकाम पाहून काहीवेळाने ते दुचाकीवरून घराकडे निघाले.

अक्कलकोट रोडवरील टेलिफोन टॉवरजवळ आल्यावर एका कारने (एमएच १४, सीके ९२४७) रिफ्लेक्टर न लावता कार अचानक उभे करून मागे-पुढे न पहाता निष्काळजीपणे अचानक उजव्या बाजूला वळण घेतले. त्यावेळी कारच्या मागील बाजूचा धक्का दुचाकीच्या डाव्या बाजूला बसला आणि दुचाकीवरील तिघेजण खाली पडले. दुचाकीवर दोन वर्षाच्या बाळाला घेऊन मागे बसलेल्या लक्ष्मी रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांच्या कानातून, नाकातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारचालक जबाबदार असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. कार मालक वागदरीजवळील व्हळसगाव (ता. अक्कलकोट) येथील असून पोलिसांनी सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

बाळाला वाचवून आईने सोडले प्राण

रमेश व लक्ष्मी यांचा संसार सुखाचा सुरू होता. त्यांना दोन मुले असून छोटा मुलगा दोन वर्षांचा आहे. नव्या घराचे बांधकाम पाहायला दुचाकीवरून जाताना त्यांनी मोठ्या मुलाला घरीच ठेवले होते. दरम्यान, अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या लक्ष्मी कुंभारीकर या डोक्यावर जोरात आदळल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण, त्यांनी आपल्याजवळील दोन वर्षाच्या बाळाला शेवटपर्यंत खाली पडू दिले नाही. ज्यावेळी लक्ष्मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, त्यावेळी दोन वर्षांचे बाळ त्यांच्या छातीवर सुखरूप होते. अपघातात लक्ष्मी यांचा मृत्यू झाला, पण खाली पडल्यानंतरही त्यांनी आपल्या मुलाला रस्त्यावर आदळण्यापासून वाचवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.