गुणवत्तेअभावी घटतोय झेडपी शाळांचा पट! शाळांच्या भेटीसाठी नाहीत केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी; 136 केंद्रप्रमुख, 10 गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त, विषय शिक्षकही कमी

पालकांचा कल ओळखून सोलापूरसह राज्यभर इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी अशा विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक देखील पुरेसे नसल्याची वस्तुस्थिती आहे.
zp schools
zp schoolssolapur sakal
Updated on

सोलापूर : पालकांचा कल ओळखून सोलापूरसह राज्यभर इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी अशा विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक देखील पुरेसे नसल्याची वस्तुस्थिती आहे. गुणवत्तेअभावी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत असून, मागील चार-पाच वर्षांत जिल्ह्यातील जवळपास १०४ शाळांना कुलूप लावावे लागले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दोन लाख १० हजार ते सव्वादोन लाखांपर्यंत अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नऊ हजार २०० शिक्षक अपेक्षित आहेत; पण अजूनही शिक्षकांची ६०० पदे रिक्त आहेत. दुसरीकडे, विषय शिक्षक कमी आहेत. सर्वच शाळांमध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या सात हजारांनी कमी झाली आहे.

विशेष बाब म्हणजे, जिल्हा परिषदेच्याच अनेक शाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. एकीकडे पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची किंवा तेथील शिक्षक कमी करण्याची कार्यवाही सुरू असतानाच दुसरीकडे अनेक शाळांचा पट क्षमतेपेक्षा जास्त वाढतोय, याचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती (पहिली ते बारावी)

  • शासकीय शाळा

  • २,९१८

  • अनुदानित शाळा

  • १,१९३

  • खासगी शाळा

  • ५९०

  • ग्रामीणमधील एकूण शाळा

  • ३,७०२

  • शहरी भागातील शाळा

  • ९९९

जिल्हा परिषद शाळांची तीन वर्षांची स्थिती

  • २०२२-२३

  • एकूण शाळा विद्यार्थी शिक्षक

  • २,८८१ २,१२,१४० ९,७००

  • --------------------------------------------------------------

  • २०२३-२४

  • एकूण शाळा विद्यार्थी शिक्षक

  • २,८६५ २,०४,८४६ ९,४००

  • --------------------------------------------------------------

  • २०२४-२५

  • एकूण शाळा विद्यार्थी शिक्षक

  • २,७७७ १.९३ लाख ९,२००

‘शिक्षण’कडील रिक्त पदे

  • केंद्रप्रमुख

  • मंजूर पदे

  • १९९

  • कार्यरत

  • ६३

  • गटशिक्षणाधिकारी

  • मंजूर पदे

  • ११

  • पूर्णवेळ कार्यरत

  • अंदाजे शिक्षक

  • ६००

प्रमुख विषयांसाठीच नाहीत पदवीधर शिक्षक

जिल्हा परिषदेकडील सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी पटसंख्येच्या प्रमाणात तीन शिक्षक मंजूर होतात. त्यात पहिला शिक्षक गणित-विज्ञानसाठी तर दुसरा शिक्षक भाषेसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी) आणि तिसरा शिक्षक समाजशास्त्रासाठी असतो. मात्र, पदवीधर बीएएससी शिक्षक मुबलक नसल्याने अनेक शाळांना पूर्णवेळ किंवा पुरेशा प्रमाणात विषय शिक्षकसुद्धा नाहीत, अशी स्थिती आहे. स्पर्धेच्या काळात इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा म्हणजेच पालकांचा कल वाढलेला असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र एकच शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवत असल्याचेही चित्र आहे.

शिक्षक कमी असल्याने कंत्राटी भरतीचा निर्णय

पटसंख्या जास्त असूनही अनेक शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील अंदाजे ५०० शाळांसाठी समानीकरणाचे तत्त्व लागू करण्यात आले आहे. त्या शाळांसाठी पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याने तेथील एक ते दोन पदे रिक्त ठेवून उर्वरित शाळांना समान प्रमाणात शिक्षक पुरविण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे, मागील सहा- सात वर्षांपासून त्याच त्या शाळांसाठी हे तत्त्व लागू असल्याने पटसंख्या जास्त असलेल्या शाळांमधील शिक्षकांवर अध्यापनाचा अतिरिक्त ताण असल्याचीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आता १० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असून, त्याची कार्यवाही सोलापूर जिल्हा परिषदेत अजून सुरू झालेली नाही.

गुणवत्ता वाढीवर आता सर्वाधिक भर

दरवर्षी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ३१५ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. पुढेही त्यासंदर्भातील नियोजन होईल. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी माझ्यासह केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांनी शाळांना भेटी देणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

पटसंख्येअभावी १०४ शाळांना कुलूप

तीन-चार वर्षांपूर्वी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या दोन हजार ८८१ इतकी होती. चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या दोन हजार ७७७ एवढी असून मागील तीन-चार वर्षांत जवळपास १०४ शाळांना पटसंख्येअभावी कुलूप लावावे लागले आहे. दुसरीकडे, अजूनही जवळपास ९६ शाळांची पटसंख्या (पहिली ते पाचवी किंवा पहिली ते सातवीपर्यंत) दहा किंवा त्याहून कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. दोनशेहून अधिक शाळांचा पट ११ ते २० या दरम्यान असून त्या ठिकाणी दोन-दोन शिक्षक कार्यरत आहेत.

पटसंख्येअभावी शिक्षक होणार अतिरिक्त

मार्च महिन्यांत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संख्या निश्चित करताना प्रत्येक पदासाठी पटसंख्या किमान किती असावी, याचे निकष घालून दिले आहेत. आधारबेस्‌ड पटसंख्या ग्राह्य धरून शिक्षक संख्या निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात पटसंख्येअभावी अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण लक्षणीय राहील, असेही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.