सोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावचा कारभार हाकणाऱ्या महिला सरपंच जैतुनबी शेख (वय ६०) या ७ सप्टेंबर २०२२ रोजी अचानकपणे बेपत्ता झाल्या. त्यांच्या मुलाने सलगर वस्ती पोलिसांत धाव घेत आई बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. विद्यमान महिला सरपंच भरदुपारी गावशिवारातून बेपत्ता झाल्याने पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. आता तब्बल २० महिने संपले, मात्र, सोलापूर शहर पोलिस त्या बेपत्ता सरपंच भाभीला शोधू शकले नाहीत.
राजकारणातील महिला आरक्षणामुळे घराला घरपण देणारी कोणाची सून, आई, बहीण, मावशी, काकी, आजी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता त्यांच्या हाती गावच्या कारभाराची जबाबदारी आली. अंतर्गत गटबाजीच्या राजकारणासह इतर अडचणींवर मात करीत अनेक महिला सरपंचांनी नेत्रदीपक कामगिरी केली. गावचा विकास करण्याच्या आशेने निवडणूक लढलेल्या जैतुनबी शेख यांच्यावर कवठे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारी आली. त्यांचा मुलगा देखील त्यांना कारभारात मदत करायचा. सरपंच आहे म्हणून ऐटीत राहणाऱ्यांपैकी जैतुनबी शेख या नव्हत्या. त्यांनी कौटुंबिक परिस्थितीमुळे शेळ्या राखण्याचा व्यवसाय कधी सोडला नाही. मात्र, सरपंचपदाचा कार्यकाळ चार-पाच महिने शिल्लक असतानाच ७ सप्टेंबर २०२२ रोजी नेहमीप्रमाणे सरपंच भाभी गावाशेजारी शेळ्या चारायला गेल्या आणि भरदुपारी त्या बेपत्ता झाल्या. पोलिस ठाण्याचे अधिकारी बदलले, तपास अधिकारी पण बदलले मात्र सरपंच भाभीचा शोध लागला नाही हे विशेष.
कवठेच्या सरपंच भाभी गेल्या कोठे? गावकऱ्यांना २० महिन्यानंतरही उत्तर मिळेना
कवठे गावच्या सरपंच भाभी बेपत्ता झाल्यानंतर पुढच्याच आठवड्यात बार्शी तालुक्यातील सौंदरे गावच्या महिला सरपंच अचानक बेपत्ता झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली. ग्रामीण पोलिसांनी सोशल मिडियावर, शेजारील जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क सुरू केला. ४८ तासांतच रत्नागिरीमधील पावस येथील एका आश्रमात त्या सापडल्या आणि पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी आणले. मात्र, कवठे गावच्या सरपंच भाभी शहर पोलिसांना अजूनपर्यंत सापडल्या नाहीत. त्या नेमक्या गेल्या कोठे, असा प्रश्न कवठे ग्रामस्थांच्या मनात २० महिन्यानंतरही कायम आहे. सरपंच भाभीची नातवंडे आता मोठी होत असून त्यांच्याही मनात पुढे जाऊन आपली आजी पोलिसांना सापडली नसल्याची खंत कायम राहील, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुरवातीला कसून तपास, नंतर फाइल क्लोज?
सरपंच भाभी बेपत्ता झाल्यानंतर शहर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी अख्खे गावशिवार तपासले. गावातील नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांकडे पण तपास केला. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सरपंच भाभीच एकच चप्पल सापडली, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सुरवातीच्या आठवड्यात पंढरपूरसह इतर आश्रमात पाहणी केली. मात्र, सरपंच भाभीला सापडलीच नाही. त्या नेमक्या गेल्या कोठे, बेपत्ता कशा झाल्या, त्यांचा घातपात झालाय का, या प्रश्नांची उत्तरे अजूनपर्यंत पोलिसांनाच सापडलेली नाहीत. सुरवातीला पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी तपास केला, कालांतराने पोलिस उपनिरीक्षक सचिन मंद्रूपकर यांच्यावर आणि नंतर एका पोलिस हवालदाराकडे तपास सोपविण्यात आला. आता काही महिन्यातील तपासाची प्रगती पाहता ‘सरपंच भाभी’ची फाइल क्लोज झाली की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.