अहमदनगर ः कोरोनाने गेल्या वर्षीपासून शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. अॉनलाइन शिक्षण परिणामकारक ठरू शकत नाही. केंद्र आणि राज्य सरकारला या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. गेल्या वर्षी पहिली आणि या वर्षी दुसरी लाट वाताहत करून केली. परिणामी शाळा सुरू करण्याचा विचार कोणाच्या मनाला शिवला नाही. सर्वत्र विदारक परिस्थिती सुरू असताना आदर्श गाव हिवरे बाजार (ता.नगर) याला अपवाद ठरले आहे.
राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. आणि पुन्हा ते कडक करण्यास सुरूवात केली आहे. परंतु हिवरे बाजारची शाळा नित्य नेमाने भरते आहे. सर्व राज्य लॉकडाउन असताना या गावाने शाळा नेमकी भरवली कशी आणि त्यांना हे कसे शक्य झाले. यामागचे रहस्य आदर्श गावचे प्रणेते, पद्मश्री पोपटराव पवार सांगतात. (The school started in the model village Hiware Bazaar)
शंभर टक्के पट
हिवरे बाजारमध्ये दहावीपर्यंत शाळा आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग जिल्हा परिषदेकडे आहेत. आणि आठवी ते दहावीचे वर्ग यशवंत माध्यमिक विद्यालयाचे आहेत. सर्वच विद्यार्थी शाळेत उपस्थित असतात. सरकारने घालून दिलेले सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जातात. एक जूनपासूनच शाळेची घंटा वाजली आहे. विशेष म्हणजे पालकांनीच शाळा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच शाळेतील वर्ग पुन्हा गजबजले आहेत.
ग्रामविकासाचे मॉडेल
दुसऱ्या लाटेत हिवरे बाजारमध्येही कोरोनाने शिरकाव केला होता. परंतु गावाने वेळीच त्यावर मात केली. गृहविलगीकरणासारखे नियम त्यांनी कटाक्षाने पाळले. त्यामुळे साथ आटोक्यात आणता आली. नगर तालुक्यातील हे गाव स्वयंपूर्ण आहे. आदर्श गाव म्हणून त्याची देशभर ख्याती आहे. अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीनंतर या गावाने जगभरात नाव कमावले. पाणलोट क्षेत्रात या गावाचा लौकिक आहे. येथील सर्व घरे महिलांच्या नावावर आहेत. गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पोपटराव पवार यांनी वाहून घेतले. त्याच कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. पूर्वी गावात दारूभट्ट्या होत्या. व्यसनाधिनतेमुळे पिढी वाया गेली होती. परंतु आता गावात कोणीच व्यसन करीत नाही. प्रत्येक उपक्रमात या गावाचा पुढाकार असतो. हे दुष्काळी गाव एकोप्यामुळे ग्रामविकासाचे मॉडेल ठरले आहे. कोरोना लढ्यातही त्यांनी आपल्या गावाची ओळख कायम ठेवली. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कोरोनामुक्तीच्या मॉडेलचे कौतुक केले.
अशी केली कोरोनावर मात
हिवरेबाजारमध्ये आरोग्य व स्वयंसेवकाच्या ४ टीम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे शेती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच हिवरे बाजार कोरोनामुक्त झाले. हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती दिली. मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
पालकांचाच पुढाकार
“कोरोनामुळे देशातील सर्वच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींजवळ स्मार्ट फोनही नाहीत. त्यांना क्लास ज्वाईन करता येत नाही. त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोणी घ्यायची. गाव कोरोनामुक्त केले तसे शाळा सुरू करण्याबाबत काय करता येईल का याचा विचार सुरू होता. विशेष म्हणजे पालकांनीच शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे शाळा सुरू करणे शक्य झाले." असे पोपटराव पवार सांगतात.
पंधरा जूनलाच वाजली घंटा
पालकांची साथ मिळाल्यानंतर पोपटराव पवार यांनी जिल्हा परिषद आणि राज्य सरकारकडे शाळा सुरू करण्याबाबत परवानगी मागितली.त्यानंतर १५ जूनपासून शाळा पूर्ववत सुरू झाली. प्रत्येक विद्यार्थ्याचे टेम्परेचर तपासले जाते. त्यांना मास्क आवश्यक करण्यात आला आहे. शाळेकडून सॅनिटायझर पुरवले जाते. सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाते. या शाळेत परगावचेही विद्यार्थी येतात. त्यांच्यावरही वॉच ठेवला जातो, त्यामुळे शाळा सुरू ठेवणे शक्य झाल्याचे पवार सांगतात.
सर्वच नियम पाळतात
पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि अगदी ग्रामपंचायत सदस्यही एसओपीचा अवलंब करतात. शाळेची वेळ तीन तासांपर्यंत कमी केली आहे. वर्ग आणि स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ केली जातात. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविडची लक्षणे तपासली जातात. विद्यार्थ्यांना कोविडची काही लक्षणे असल्यास अवगत करण्यास सांगितले आहे. गावातील तीन डॉक्टर उपचार करण्यास मदत करतात. शाळेतील शिक्षक गावात राहत असल्याने शाळा सुरू करणे मुश्कील झाले नाही.
शाळा सुरू करण्यास परवानगी नाही तरीही...
“शाळा सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी नाही. जिल्हा परिषदेच्या पथकाने गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे. तेथील पालकांनीच विनंती अर्ज केला होता. पाल्याची सर्व जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. हिवरे बाजार ग्रामपंचायतही नियमांचे पालन करीत आहे. त्यामुळेच तेथे शाळा उघडल्या गेल्या, असे जिल्हा परिषद प्रशासन सांगते. हिवरे बाजारप्रमाणे इतर ग्रामपंचायत व पालकांनी पुढाकार घेतल्यास पुन्हा शाळा उघडतील.
अॉनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही गावात मे महिन्यात सर्व्हे केला. १० टक्केच मुलं गुणवत्तेत खरी उतरली. त्यामुळे पालकांसोबत चर्चा केली. तेही शाळा सुरू करण्यास धजावत नव्हते. सर्वांची बैठक बोलावून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने हमी घेतली. त्यामुळे हे शक्य झाले.
- पद्मश्री पोपटराव पवार, हिवरे बाजार.
(The school started in the model village Hiware Bazaar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.