सोलापूर : राज्यात गतवर्षी एक कोटी ४० लाख हेक्टरवरील खरीप पिकांमधून २३८ लाख मे.टनाचे उत्पादन मिळाले होते. यंदा एक कोटी ३८ लाख ६४ हजार हेक्टरवर (ऊस वगळून) खरीप पेरणी झाली असून सध्या ३०६ महसूल मंडळात २५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे उत्पन्नात निम्म्याने घट होऊन शेतकऱ्यांना तब्बल सव्वा लाख कोटींपर्यंत फटका बसणार आहे.
विदर्भ, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. यंदा ५० लाख हेक्टरवर सोयाबीन तर आठ लाख हेक्टरवर उडीद, मूग आणि कापसाची जवळपास ३० लाख हेक्टरवर लागवड (पेरणी) झाली. पण पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
१५ जूनपासून पावसाळा सुरु होऊनही बहुतेक जिल्ह्यांमध्ये ८ जुलैपासून पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अद्याप राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्केसुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. काही धरणे तळाशी असून मध्यम प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणीपातळीही वाढलेली नाही. राज्यातील ३००हून अधिक महसूल मंडळांमध्ये पावसाचा ४ आठवड्यापेक्षा जास्त खंड पडला असून पिकांनी माना टाकल्या आहेत.
कृत्रिम पावसाचा प्रयोग नाहीच
पावसाळा सुरु झाल्यानंतर ढग येतात, पण पाऊस पडत नाही, अशावेळी काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडला जातो. हवेतील बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. महाराष्ट्रात २००३ व २००४ आणि २००९, २०१० व २०१९ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाची शक्यता वर्तविली गेली, पण तसा कोणताही विचार नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
‘खरीप’ पेरणीचे क्षेत्र (उसासह हेक्टरमध्ये)
धान्य प्रकार पेरणी क्षेत्र प्रत्यक्षात पेरणी
गळीत धान्य ४३,९२,३४० ५१,४५,४६४
तृणधान्ये ३४,७०,२७९ २९,४४,३०८
कडधान्ये २१,३८,५५१ १५,९१,१७८
अन्नधान्ये ५६,०८,८५० ४५,३५,४८७
कापूस ४२,०१,१२८ ४१,८६,६१०
एकूण १,९८,११,१४८ १,८४,०३,०४७
मागील वर्षी २३८ लाख मे.टन उत्पन्न, यंदा...
मागील वर्षी राज्यात एक कोटी ४० लाख ७६ हजार ६६३ हेक्टरवर (ऊस सोडून) पेरणी झाली होती. त्यातून २३८ लाख मे.टन एवढे उत्पादन आले होते. यंदा राज्यातील एक कोटी ३८ लाख ६४ हजार ५६१ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली, पण पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादनात अंदाजे सव्वालाख कोटी मे.टनापर्यंत घट होवू शकते.
ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार दुष्काळी तालुके
१५ जून ते ३० सप्टेंबर या काळातील राज्यातील अपेक्षित पाऊस व प्रत्यक्षातील पाऊस, याचा आढावा घेऊन दुष्काळी तालुके जाहीर केले जाणार आहेत. दुष्काळ जाहीर करताना पाच प्रमुख मुद्द्यांचा विचार केला जातो. त्यात अपेक्षित पाऊस व पडलेला पाऊस आणि पिकांचे अंदाजे नुकसान व जमिनीतील पाण्याची पातळी, धरणातील पाणीसाठ्याचा विचार होतो.
पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांचे सर्वेक्षण
गतवर्षी २३४ ते २४० लाख मे.टन एवढे खरीप पिकांचे उत्पादन मिळाले, पण यंदा राज्यातील ३००हून अधिक महसूल मंडळात पावसाचा मोठा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आता जिल्हानिहाय सर्वेक्षण सुरु केले आहे.
- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.