सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडील मृत चार शिक्षकांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी (ता. १६) कुटुंब निवृत्ती वेतनाच्या मंजुरीचे आदेश देण्यात आले. तसेच उर्वरित शिक्षकांचे प्रश्न सोमवारी सोडविण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दिले. त्यानंतर मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता. १५) उपोषण मागे घेतले. तर आदेश हाती पडताच मृत शिक्षकांच्या पत्नींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
जिल्ह्यातील १५ हून अधिक नव्या पेन्शनधारक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. गत डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या कुटुंबियाचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव मंजुरीविना पडून होते. त्यातील नऊ प्रस्तावांवर पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने त्या कुटुंबीयांना उपासमारीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, नव्या कुटुंब निवृत्ती योजनेचे हे लाभार्थी पहिलेच असल्याने आणि त्याबाबत काही माहिती मागवावी लागल्याने विलंब झाला. त्या प्रस्तावांना मान्यता देऊन मंजुरीसाठी पाठविल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते.
सीईओंकडून दखल अन् मृत शिक्षकाच्या पत्नीला पेन्शन
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेत प्रशासनासह शिक्षण व लेखा विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच चार शिक्षकांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर झाल्याचे आदेश दिले. यावेळी संघटनेचे तात्यासाहेब जाधव, लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे, रामराव शिंदे, किरण काले, साईनाथ देवकर, दयानंद चव्हाण, नमिता शिर्के, सुप्रिया काळे, अश्विनी पाटील, वंदना सुतार, वैशाली उंबरजे आदी उपस्थित होते.
मृत शिक्षकांच्या पत्नी भावुक
कुटुंब निवृत्ती वेतन मंजुरीचे आदेश देण्यापूर्वी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाकडे यांनी आस्थेवाईकपणे मृत शिक्षकांच्या पत्नींचे म्हणणे ऐकून घेतले. सेवापुस्तिका पडताळणीबाबत संबंधित कर्मचाऱ्याने चुकीची माहिती देत टोलवाटोलवी केल्याचे सांगितले. तर संघटनेनेही मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांची हेळसांड होत असल्याचे सांगितले. त्यावर प्रशासनाकडून झालेल्या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त करीत वाकडे यांनी त्यांना मंजुरीचे आदेश दिले. त्यांची विनम्रता पाहून व हाती पडलेल्या आदेशामुळे मृत शिक्षकांच्या पत्नी भावुक झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.