सोलापूर : शहरात येताना सुरवातीला मोकाट जनावरांमधून मार्ग काढत वाहने पुढे येतात. पुढे एसटी स्टॅण्ड परिसरात अस्ताव्यस्त थांबलेल्या रिक्षा, रस्त्यांलगतचे हातगाडे, रस्ता ओलांडून बस स्थानकाकडे जाणारे लोक, यातून मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक पार करावा लागतो. तेथून नवीवेस पोलिस चौकीकडे जाताना निराळे वस्तीच्या दिशेने ये-जा करणारी वाहने, भागवत चित्रमंदिरसमोर नवीपेठेतून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. नवीवेस पौलिस चौकीसमोरही अशीच स्थिती आहे. अंदाजे ३०० मीटरचे अंतर पार करायला प्रत्येक वाहनचालकाला ब्रेकवर पाय ठेवावाच लागतो आणि किमान पाचवेळा तरी ब्रेक दाबावाच लागतो, अशी स्थिती आहे.
स्मार्ट सिटी सोलापुरातील वाहनांची संख्या आता सात लाखांवर पोचली आहे. दररोज ग्रामीण भागातून व परजिल्ह्यातून, परराज्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीवेस पोलिस चौकी, होटगी रोड, सात रस्ता, जुना बोरामणी नाका, रंगभवन ते डफरीन चौक, विजयपूर रोड, रेल्वे स्थानक अशा परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते.
शहरातील वाहतूक नियमन व्यवस्थित व्हावे म्हणून गजबजलेल्या रस्त्यांवर विशेषत: चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असणे अपेक्षित आहे. सिग्नल नसल्यास त्या चौकांमध्ये वाहतूक अंमलदार तरी नेमला जावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यांच्या दिशेने तोंड करून असलेल्या दुकानांसमोर उभारलेल्या वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होते. पार्किंगअभावी रस्त्यांलगत थांबलेली वाहने व रस्त्यांलगतच्या दुकानांसमोरील वाहनांची व्यवस्था केल्याशिवाय वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा बंद होणारच नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
‘डीसीपीं’नाही काही वेळ थांबावे लागले
चार दिवसांपूर्वी जुना पुना नाका येथून पोलिस उपायुक्त पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने जात होते. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गाडी पाहून चौकाचौकात उभारलेले वाहतूक अंमलदार त्यांना सॅल्युट करीत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीवेस पोलिस चौकीच्या दिशेने जात असताना भागवत चित्रमंदिरसमोर बेशिस्त वाहतुकीमुळे त्यांना काहीवेळ एकाच जागेवर थांबावे लागले. नवीपेठेतून या रोडला वाहने बिनधास्तपणे येतात आणि त्यामुळे तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन
एसटी स्टॅण्डसमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे नवीवेस पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी नियोजन केले जात आहे. रस्त्यांवरील दुकानदारांना नोटीस देऊन त्यांच्या दुकानासमोर वाहने थांबणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे.
- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
असा निघू शकतो कायमचा तोडगा
मुख्य रस्त्यांलगत वाहने थांबणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीवेस पोलिस चौकीपर्यंत बॅरिकेटिंग करावे
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीपेठेकडून जाणारा रस्ता वन-वे करावा
छत्रपती शिवाजी महाराज चौक व नवीवेस पोलिस चौकीसमोर कायमचे वाहतूक पोलिस नेमावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.