जलसंपदा अधिकाऱ्यांची सतर्कता अन्‌ पंढरपूरचा पूर टळला! भीमा नदीत सध्या 40,000 क्युसेकचा विसर्ग; उजनी धरणात सध्या 106 टक्के पाणीसाठा

पुण्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून उजनी धरणात सव्वादोन लाखांपर्यंत विसर्ग जमा होत होता. त्यावेळी उजनी १०० टक्के भरले होते, अशावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उजनीतून ४० हजार ते सव्वालाखांपर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने भीमा नदीत सोडण्यात आला.
ujani dam
ujani damsolapur
Updated on

सोलापूर : पुण्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून उजनी धरणात सव्वादोन लाखांपर्यंत विसर्ग जमा होत होता. त्यावेळी उजनी १०० टक्के भरले होते, अशावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उजनीतून ४० हजार ते सव्वालाखांपर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने भीमा नदीत सोडण्यात आला. त्यावेळी धरणात आणखी सात टक्के म्हणजेच साडेतीन टीएमसी पाणी साठवून ठेवण्यात आले. त्यामुळे भीमा नदी पात्रातील पाणी नियंत्रणात राहिले आणि पूरस्थिती निर्माण झाली नाही.

उजनी धरणातून भीमा नदीत एकदम एक लाख ३० हजार ते दीड लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्यावर गोपाळपुरात नवीन पुलावर पाणी येते. तर सव्वादोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग सोडल्यास पंढरपुरातील गोविंदपुरात पाणी शिरते. चार दिवसांपूर्वी दौंडवरून येणारा विसर्ग व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन नदी काठावरील गावांना पुराचा धोका होणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाचे अधिकारी वारंवार घेत होते.

सुरवातीला उजनीतून ४० हजार विसर्ग सोडण्यात आला, काही तासांनी तो ६० हजार क्युसेक करण्यात आला. काहीवेळाने ८० हजार, एक लाख आणि शेवटी सव्वालाखांपर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. त्याचवेळी वीर धरणातून भीमा नदीत येणाऱ्या विसर्गाचाही अंदाज घेतला जात होता. या सतर्कतेमुळे व नियोजनामुळे पंढरपूरसह भीमेच्या काठावरील गावांना पुराचा फटका बसला नाही, असे धरणातून पाणी सोडणारे अधिकारी सांगतात.

उजनीवरील धरणे भरली, आता पूर नियंत्रणावर लक्ष

उजनी धरणावरील चासकमान, मुळशी, पवना, वडिवळे, कासारसाई, आंद्रा, खडकवासला, भामा आसखेड, घोड ही धरणे ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. आता पुणे जिल्ह्यात पाऊस पडला की धरणात येणारा विसर्ग खाली नदीत सोडून दिला जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे उजनी धरणा १०५ ते १०६ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा ठेवला जात आहे. दौंडवरून दोन-अडीच लाख क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात येवू लागला तरी सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठावरील गावांना पुराचा फार धोका होणार नाही, याची दक्षता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे घेत आहेत.

कॅनॉलमधून १९०० क्युसेकचा विसर्ग

उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आता भीमा नदीतून ४० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर उजनी धरणात दौंडवरून २५ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. वीर धरणातूनही विसर्ग बंद झाला आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी काठोकाठ भरलेली भीमा नदी पात्रातील पाणी आता कमी झाले आहे. उजनीतून आता उपसा सिंचन योजनांसह बोगदा व कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या १९०० क्युसेकने सोडलेला कॅनॉलमधील विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.