राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन आता तीन महिने उलटले आहेत. या काळात पक्षाच्या पातळीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या राजकीय घडामोडींसोबतच राज्याचा गाडा हाकण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार खुबीने करीत आहेत.
त्यांच्यासोबत पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत, मात्र तरीही सर्वांच्या मनात साशंकता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या आमदारांची अपात्रतेसंबंधी सुनावणी सुरू आहे.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष आणि निवडक कार्यकर्ते यांचे दोन दिवसीय शिबिर रायगड जिल्ह्यामधील कर्जत येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी केलेली बातचीत.
निवडणुकांना वर्ष असताना पक्षाच्या आमदारांचे शिबिर घेण्याचे प्रयोजन काय?
तटकरे : पक्ष सत्ताधारी झाला म्हणजे पक्षाचे नियमित कार्यक्रम घेऊ नयेत, असे नाही. कार्यकर्त्यांना एकत्र करणे, त्यांना पक्षाची ध्येयधोरणे सांगणे आणि त्यानुसार नियोजन करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात आमदारांना काय सल्ले देणार?
तटकरे : या शिबिरात सल्ले वगैरे दिले जात नाहीत. परंतु, आमचे नेते अजित पवार यांना आमदारांशी, कार्यकर्त्यांशी बोलायचे असते. मुळात आमदार आणि कार्यकर्ते यांच्या अडचणी नेत्याने समजून घेतल्या नाहीत, तर पक्षाच्या दृष्टीने ते मारक ठरू शकते.
अजित पवार तर आमदारांशी आठवड्याला बोलतात. आता नवीन काय बोलणार?
तटकरे : मुळात सत्ताधारी पक्षाचे आमदार हे शासनाचा भाग असतात, तर जिल्हाध्यक्ष हे राजकीय पक्ष म्हणून पक्षाचे कान आणि डोळे असतात. या दोन्ही घटकांना एकत्रित करून पक्षवाढीच्या दृष्टीने काय करता येऊ शकते, याचा आढावा यात घेतला जाईल.परंतु, नेत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे, हे पक्षाच्या दृष्टीने नेहमीच चांगले असते. नाहीतर काही पक्षांचे नेते आमदारांनाही भेटत नसल्याचे परिणाम काय होतात, हे आपण गेल्यावर्षी बघितले आहे. तरीही प्रश्न राहतो शिबिर कशासाठी. तर या शिबिरात प्रत्येक कार्यकर्त्याशी अजित पवार संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतील.
पक्षाचे कार्यकर्ते दोन गटांत विभागले आहेत. या आव्हानांवर कसा मार्ग काढणार?
तटकरे : मुळात आमच्या पक्षात फूट पडली नाही. त्यामुळे कार्यकर्ते विभागले गेले आहेत, असे आजतरी वाटत नाही. याबाबत जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मनातील संशय दूर करण्यासाठीच हे शिबिर होणार आहे.
पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त अन्य लोकांचे मार्गदर्शन होणार आहे का?
तटकरे : होय. काही विचारवंतांचे मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे. आमच्या पक्षाची बांधिलकी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी आहे. तोच विचार घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. राज्याचा विकास कसा करता येईल. पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता काय योगदान देऊ शकतो, याचे मंथन या शिबिरात होईल.आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.