सोलापूर : सध्याची लोकसंख्या ११ लाखांवर आणि क्षेत्रफळ अंदाजे १५० स्क्वेअर किलोमीटर व सात पोलिस ठाणी, अशी सोलापूर पोलिस आयुक्तालयाची सद्य:स्थिती आहे. दरवर्षी चार हजारांहून अधिक गुन्हे दाखल होतात आणि त्यात शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. चोरी, घरफोडी, कौटुंबिक छळ, अत्याचार, विनयभंग, अशा गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. तरीदेखील शहर पोलिसांकडील मनुष्यबळ दोन हजार ९२ अंमलदार व ११५ अधिकारी एवढेच आहे. राज्यातील बहुतेक शहर- जिल्ह्यातील स्थिती जवळपास अशीच आहे.
सोलापूर शहराचा १९९०च्या दशकातील विस्तार आणि सद्य:स्थिती यात खूप मोठा फरक झाला आहे. विस्तार वाढला तरीदेखील पोलिस ठाण्यांची संख्या मर्यादितच असून अवघ्या सात पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे सर्वाधिक सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यातही सोलापूर शहर राज्यात अव्वल आहे. तरीदेखील ना पोलिस आयुक्तालयाचा विस्तार होतोय ना मनुष्यबळात वाढ झाली.
काही वर्षांपूर्वी शहरांतर्गत नवीन पोलिस ठाणे निर्मिती व नव्याने पदनिर्मितीचा प्रस्ताव गृह विभागाला यापूर्वीच पाठवला आहे, पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही हे विशेष. नवीन आकृतिबंधानुसार नवीन पोलिस ठाण्यांना वाढीव मनुष्यबळ मिळणार आहेत, पण जुन्या पोलिस ठाण्यासाठी हा आकृतिबंध लागू नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण व तपासाचा वेग कमीच असल्याची वस्तुस्थिती आहे.
बंदोबस्ताची ड्यूटी २३० दिवस, दैनंदिन काम कसे करायचे?
सोलापूर शहरात वर्षातील ३६५ दिवसांपैकी तब्बल १५३ दिवस विविध प्रकारच्या मिरवणुकाच असतात. त्यानंतर वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या प्रश्नांवरून मोर्चे, आंदोलने, राजकीय सभा, नेते, मंत्र्यांचे दौरे, निवडणुका, अशा विविध कारणांसाठी देखील दरवर्षी सरासरी ८० ते ९० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागतेच. अशी स्थिती राज्यातील बहुतेक शहरांमध्ये आहे. वर्षातील सव्वादोनशेहून अधिक दिवस जर बहुतेक पोलिसांना बंदोबस्ताचीच ड्यूटी करावी लागते. त्यामुळे त्यांच्याकडील गुन्ह्यांच्या तपास कधी करायचा हा प्रश्न संपूर्ण राज्यभरातच उपस्थित होतोय. कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि बंदोबस्त, गुन्ह्यांचा वेळेत तपासाचे आव्हान, मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण, यामध्ये अनेकांचे आरोग्य बिघडत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांची वाढ व वाढीव मनुष्यबळ काळाची गरज आहे.
सोलापूर शहरातील पोलिस ठाणेनिहाय मनुष्यबळ
पोलिस ठाणे मंजूर पदे हजर
फौजदार चावडी १४९ ११०
एमआयडीसी २०७ १२८
जोडभावी १४२ १०२
सदर बझार १२५ १२२
विजापूर नाका १११ ११९
सलगर वस्ती ६५ ५९
शहर वाहतूक (दक्षिण) ९२ ७९
शहर वाहतूक (उत्तर) ९३ ६८
एकूण ९८४ ७८७
सोलापूर शहरातील गुन्ह्यांची स्थिती
शरीराविरुद्धचे गुन्हे : ५० टक्के
चोरी-घरफोडी : २० टक्के
फसवणुकीचे गुन्हे : २० टक्के
इतर : १० टक्के
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी अन् स्वत:हून कायद्याचा धाक बाळगावा
सोलापूर शहराचा विस्तार, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळ कमी आहे. तरीदेखील पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास आणि पोलिसांच्या धाकापेक्षा स्वतःहून कायद्याचा धाक बाळगल्यास निश्चितपणे पोलिसांवरील ताण कमी होईल. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढणार नाही.
- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.