सोलापूर : पुणे जिल्ह्यात आयटी पार्क तथा कंपन्यांच्या वाढीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून सोलापुरातही आयटी कंपन्या याव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर महेश कोठे यांनी महापालिकेच्या टाऊन प्लॅनिंग कार्यालयाकडे सलगरवाडी येथील नियोजित आयटी पार्कच्या बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे तर आता अधिकारी सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले जात आहे. नवीन अधिकारी शासनाकडून मिळाले, पण त्यांनाही अजून यासंदर्भातील माहिती नाही. त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या एका अर्जाला परवानगी मिळाली आहे.
नवीन उद्योग येण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा, पुरेशा सोयी-सुविधा, महापालिका किंवा ग्रामपंचायतीची कर सवलत, उद्योगाच्या परवानगीसाठी ‘एक खिडकी’ जरुरी असते. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे १० आणि विधानपरिषदेचा एक, असे एकूण ११ आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. तरीदेखील जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित एमआयडीसींचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. दुसरीकडे पूर्वीच्या एमआयडीसींमध्ये उद्योजकांनी जागा मागूनही जागा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड), चिंचोळी, मंगळवेढा, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा या एमआयडीसी अस्तित्वात आहेत. याशिवाय कासेगाव, कुंभारी, मोडनिंब, अतिरिक्त चिंचोळी, गौडगाव (बार्शी) टप्पा दोन, गारवाड (माळशिरस) या सहा नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहेत. दरम्यान, आयटी कंपन्यांत सोलापुरात येतील अशा सोयी-सुविधा, दळणवळणाची साधने मुबलक आहेत. आता फक्त लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा जरुरी असल्याचे मत परजिल्ह्यातील आयटी कंपन्यांमधील अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.
सोलापुरातील अभियंत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये
सलगरवाडी येथे १२ एकर आणि अक्कलकोट एमआयडीसीत दहा एकर जमीन आहे. त्याठिकाणी आयटी पार्क उभारावे, यासाठी पंचशील ग्रुप व आर.एन. ग्रुपकडे पाठपुरावा सुरू आहे. सोलापुरातील अभियंत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, त्यांचाही सोलापूरच्या विकासाला हातभार लागावा म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने नवीन उद्योगांसाठी विशेष परवानगी द्यावी, जेणेकरून उद्योग लवकर सुरू होतील आणि सोलापूरच्या सुशिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबेल.
- महेश कोठे, माजी महापौर, सोलापूर
अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, माहिती घ्यावी लागेल
महेश कोठे यांनी टाऊन प्लॅनिंग कार्यालयाकडे बांधकाम परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केला असेल. त्यांनी ज्या अभियंत्याकडून तो आराखडा तयार केला आहे, त्यांना माहिती असेल परवानगीचा अर्ज नेमका कोठे थांबला आहे. माहिती घेतल्यावर यासंदर्भात मला सविस्तर सांगता येईल.
- राजेश दणाणे, टाऊन प्लॅनिंग अधिकारी, सोलापूर महापालिका
परजिल्ह्यातील आयटी कंपन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ५० हजारांवर अभियंते
जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी पाच हजार अभियंते तयार होतात. त्यातील जवळपास बाराशे अभियंते कॉम्प्युटर व माहिती-तंत्रज्ञान या विषयाचे आहेत. सोलापूर शहर स्मार्ट सिटी होऊनही शहर-जिल्ह्यात एकही आयटी कंपनी (आयटी पार्क) आलेली नाही. त्यामुळे अपेक्षा तथा स्वप्नपूर्तीसाठी त्यांना स्वत:च्या कुटुंबाला येथेच सोडून पुणे, बंगळूर, हडपसर अशा ठिकाणी जावे लागत आहे. ‘नॅस्कॉन’वरील माहितीनुसार हिंजवडी परिसरातील १३९ आयटी कंपन्यांमध्ये दोन लाख १७ हजार ४१२ अभियंते कार्यरत आहेत. त्यात सोलापूरचे अंदाजे ४५ हजार अभियंते आहेत. याशिवाय बंगळूर, हडपसर येथील कंपन्यांमध्येही पाच ते सात हजार अभियंते सोलापूरचेच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.