गडचिरोली : मार्च महिन्याच्या २० तारखेला जागतिक चिमणीदिन साजरा होत असताना गडचिरोली शहरात मात्र, या अचानक चिमणीदिनी वाघीणच आली. शहरातील मुख्य मार्गावरील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेल्या या वाघिणीला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्पशुटर अजय मराठे यांच्या चमूने मोठ्या शिताफीने डार्ट करून बेशुद्ध करत जेरबंद केली. गडचिरोली शहरात अशा प्रकारे वाघीण येण्याची ही गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
ग्रामीण भागासह आता शहरातही वाघ दर्शन देऊ लागले आहेत. सोमवार (ता. २०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावरील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या रोपवाटिकेत जाताना अनेकांनी या वाघिणीला बघितले. ही माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रोपवाटिकेत दाखल झाले. वाघीण रोपवाटिकेत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली. वनविभागाने पोलिसांना पाचारण केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता आले.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
यादरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास चंद्रपूरहून डॉ. रविकांत खोब्रागडे व शार्पशुटर अजय मराठे यांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण वाघीण सतत त्यांना हुलकावणी देत होती. ती एका ठिकाणी स्थिर राहत नसल्याने आणि या परिसरात खूप झाडोरा असल्यामुळे तिला बंदुकीतून बेशुद्धीचा डार्ट मारणे कठीण जात होते. पण अशा अभियानाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी जवळून चालत असलेल्या वाघिणीला कौशल्याने योग्य ठिकाणी डार्ट मारला.
वाघीण बेशुद्ध होताच तिची सर्व तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला स्ट्रेचरवरून ट्रॅक्टरवर असलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. अँटीडोट दिल्यावर वाघीण शुद्धीवर आली. ही वाघीण साधारणत: साडेतीन वर्षाची असून सुस्थितीत आहे. तिच्या मानेवर एक जखम असल्याची माहिती मिळाली आहे. आत्माच्या या रोपवाटिकेत अनेक वृक्ष असून हा परिसर घनदाट जंगलासारखाच आहे. येथे रानडुकरे नेहमीच असतात. ही वाघीण रानडुकरांचा पाठलाग करतच या परिसरात आली. तिने एक रानडुकराचे पिल्लूही ठार केले होते.
शहराच्या मध्यभागी अतिशय वर्दळीच्या परिसरात वाघीण असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. पण, वनविभागाने कौशल्याने हे प्रकरण हाताळले. हे अभियान वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. या संपूर्ण अभियानात उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे तसेच वनाधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गर्दीची समस्या हाताळली.
...तर उद्भवली असती गंभीर स्थिती
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील ज्या रोपवाटिकेत ही वाघीण आली होती त्या परिसरापासून शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषदेची इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, जलसंपदा विभागाचे कार्यालय, कृषी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे सारे हाकेच्या अंतरावर आहे. भरवस्तीत आलेली वाघीण इथून बाहेर पडली असती तर कदाचित शहरातच भटकत तिने काही जणांवर हल्ला करण्याची शक्यता होती. पण, डॉ. रविकांत खोब्रागडे व अजय मराठे तसेच वनविभागाने नियोजनबद्धरीत्या हे प्रकरण हाताळत वाघिणीला अलगद जेरबंद केले. त्यामुळे संभाव्य धोका टळला.
व्याघ्र बचावाचे अर्धशतक...
डॉ. रविकांत खोब्रागडे व अजय मराठे यांना मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्याचा व वाघ, बिबट, अस्वल असे अनेक प्राणी जेरबंद करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अशा समस्याग्रस्त वाघांना जेरबंद करण्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. या वाघिणीसह त्यांनी आतापर्यंत ५२ वाघांना जेरबंद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.