मुंबई : उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे ठाम वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्त ‘साम’ टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी ‘साम’ आणि ‘सकाळ’साठी खास मुलाखत घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचेही राऊत म्हणाले.
‘‘उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री ही पुडी आहे. आमची बांधिलकी पाच वर्षच!,’’ असे राऊत यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर, २०२४ च्या निवडणुकीतही ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे समीकरण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘महाराष्ट्राचा राजकारणातील ठाकरे आणि पवार हे एकत्र आले तर देशाचे राजकारण बदलेल. मी ती इच्छा पूर्ण केली,’’ असे राऊत म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडी एकत्र लढली तर, महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असे भाकीत देखील राऊत यांनी केले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची चर्चा होते. काँग्रेसला सरकारमध्ये स्थान नाही असे त्यांना वाटत नाही, असे म्हणत राऊतानी नाना पटोले यांना टोला लगावला. ‘‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वाद होतात. युतीत होतो तेव्हा आम्ही महापालिकेत वेगळे लढलो. तिथे धोरणात्मक निर्णयही असतात. तिन्ही पक्षांचे वाटप अडचणीचे असते. कार्यकर्त्यांना सामावून घेता येत नाही,’’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
अजित पवार-फडणवीस शपथविधी झाल्यावर तीन आमदार ‘सिल्व्हर ओक’ला पोहोचले. राजेश टोपे हे त्यातले एक होते असे राऊत यांनी सांगितले. ‘‘मधल्या काळात सरकार पडण्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. हे जाऊन अमित शहा ना भेटले, त्यांनी अजित दोवालांची भेट घेतली असे सांगत राहिले. अजूनही बातम्या सोडतात लवकरच राऊत तुरुंगात जाणार, अजित पवार तुरुंगात जाणार. कशाकरता? फालतू चिखलफेक करतात ते प्रतिष्ठेला शोभणारे नाही,’’ असे राऊत म्हणाले.
हे सरकार शरद पवार चालवतात या दाव्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, ‘‘पवार हे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी काही सुचविले तर ते राबवायला पाहिजे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये इतकी कुरबुर नाही. भाजप-शिवसेना सरकार असताना भांडी वाजून फुटत होती. इथे मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणाचा हस्तक्षेप नाही.’’
कंगना राणावतच्या वक्तव्यबाबत बोलताना राऊत म्हणाले ‘‘भाजपने तिचा राष्ट्रीय पुरस्कार काढून घेतला पाहिजे. वीर सावरकर भिकारी होते का? गांधीजींची दांडी यात्रा, लाल-बाल-पाल यांचा कायदेभंग हे भिकाऱ्यांचे आंदोलन होते का?’’
... तर पुन्हा कृषी कायदे येतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे परत आणू शकतात असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. राऊत म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला. कधी कृषी कायदे मागे घेतले? १३ राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला. दुर्दैवाने उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.