Uddhav Thackeray : भाजपची राजकीय कबर बांधणार ; उद्धव ठाकरेंचा घणाघात, शहा अब्दालीचे वंशज असल्याचा आरोप

‘‘तुम्ही निवडणूक कधीही घ्या, आम्ही तयार आहोत. पावसाचे थैमान थांबल्यानंतर महाराष्ट्रात भगव्याचे थैमान येणार आहे. माझ्या पाठीवर खूप वार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर जेवढे वळ उमटले आहेत, त्यापेक्षा जास्त वळ विधानसभेत उमटतील.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sakal
Updated on

पुणे : ‘‘तुम्ही निवडणूक कधीही घ्या, आम्ही तयार आहोत. पावसाचे थैमान थांबल्यानंतर महाराष्ट्रात भगव्याचे थैमान येणार आहे. माझ्या पाठीवर खूप वार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर जेवढे वळ उमटले आहेत, त्यापेक्षा जास्त वळ विधानसभेत उमटतील. यांची वळवळ कायमची थांबविण्यासाठी औरंगजेबाप्रमाणे चोर, दरोडेखोर भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधायला सज्ज व्हा,’’ असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. अमित शहा हे अब्दालीचे वंशज असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

पुण्यात शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत ‘चला जिंकूया’ या गटप्रमुखांच्या शिबिरात ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सचिन आहिर, मिलिंद नार्वेकर, शशिकांत सुतार, रवींद्र नेर्लेकर आदी या वेळी उपस्थित होते.

आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून आम्ही धर्मांध आहोत, शाखेत मुस्लिमांविरोधात शिकवण दिली जाते, ही चर्चा खोटी आहे. आम्हाला सर्वधर्मसमभाव मान्य आहे, असे स्पष्ट केले होते. त्यांचे इतर लेखही आहेत. मग तुम्हाला देवरस यांचे हिंदुत्व मान्य नाही का? तोडा फोडा, घरे जाळा असले हिंदुत्व भाजपचे आहे का? याचे उत्तर अमित शहांनी द्यावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे नदीचे प्रवाह बदलले जात आहेत. मी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला स्थगिती दिली होती, पण आमची सत्ता गेल्यानंतर पुन्हा काम सुरू केले. ज्यांनी गळकी संसद बांधली, त्याच गुजराती कंपनीकडे या प्रकल्पाचे काम आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

नायडू, नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का

आम्ही काँग्रेसशी आघाडी केली, तर हिंदूविरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडे डोळेझाक करून आमच्यावर टीका करता, असे प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

शहा अब्दालीचे वंशज

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष अशी टीका केली होती. त्याचा उद्धव ठाकरे यांनी आज खरपूस समाचार घेतला. ‘‘इतिहासात आपण डोकावले, तर शाहिस्तेखानाची पुण्यात बोटे कापल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. त्याचे काही शहाणपण अमित शहांनी घेतले असते तर ते महाराष्ट्रात आले नसते. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर किती उमटले आहेत, हे पाहण्यासाठी अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा पुण्यात आले. तो अहमदशहा होता आणि हे अमित शहा आहेत. अहमदशहाचा राजकीय वंशज इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणत असले तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. जो विश्‍वासघात करतो तो हिंदू नसतो, हे शं‍कराचार्यांनी म्हटले आहे. भाजपने आमचा विश्‍वासघात केला आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

ढेकणाला आव्हान नाही, चिरडतात

देवेंद्र फडणवीसांनी मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचे डाव रचले. तरीही मी हिमतीने उभा राहिलो. आता एक तर तू राहशील किंवा मी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. त्याचे पडसाद राजकारणात उमटले. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत हे वाक्य वैयक्तिक नाही, असे सांगितले. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला आव्हान दिले जात नाही, तर चिरडले जाते. त्याने सांगितले माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किमतीचा तू नाहीच आहेस”, अशी जहरी टीका ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा केली.

ठाकरे म्हणाले...

  • शिवसेनेची मशाल ही अन्याय जाळून टाकणारी आहे

  • आमदारांची मुदत संपत आली तरी निर्णय नाही

  • लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून करून राज्यात सत्तांतर केले, तरी ‘सर्वोच्च’ न्याय मिळायला उशीर

  • शिवसैनिकांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन

  • आपली बाजू मांडावी

  • हा लढा माझ्यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सुरू केला आहे

  • मोदींविरोधात स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे, असे राज्यातील जनता सांगेल

भाजपचा उलटवार

उद्धव ठाकरेंचे फडणवीस आणि शहांबद्दलचे घाणेरडे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता कधीच खपवून घेणार नाही. जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

- चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून ते स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहोत हेच दाखवून दिले आहे. सध्या ते प्रचंड निराश झाले असल्याने त्यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.