उजनी जलाशयावर करोता, काळशिर खंड्याचे प्रथमच दर्शन

ujani lake
ujani lake
Updated on

कळस- थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव ते कुंभारगाव पट्ट्यातील उजनीच्या फुगवट्यावर रोहित, सिगल, थापट्या, शंभू बदक, ब्राह्मणी डक, स्पॉटबिल, स्पूनबिल, वारकरी, राखी बगळे व विविध प्रकारच्या पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे. त्यात रोहित पक्ष्यांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे येथील पक्षिनिरीक्षकांकडून सांगण्यात आले. यंदा प्रथमच करोता व काळशिर खंड्या हे पक्षीही या जलाशयावर आढळून आल्याचे सांगण्यात आले.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी पक्षी यायला सुरवात करतात. सुरवातीला त्यांची संख्या कमी असते. परंतु, डिसेंबरमध्ये त्यांची संख्या वाढते. जानेवारीपर्यंत येथे विणीच्या हंगामासाठी येणारे पक्षी लाखोंच्या संख्येने आढळून येतात. पावसाळा सुरू होईपर्यंत येथे या पक्ष्यांचा मुक्काम असतो. दरम्यानच्या काळात विणीचा हंगाम उरकून नवजात पिल्लांच्या पंखात बळ आल्यानंतर येथून हे पक्षी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात. उजनीचा विस्तीर्ण जलाशय, मुबलक खाद्य यामुळे येथे दरवर्षी पक्षी आपली हजेरी लावत असतात. रोहित पक्ष्यांची नेत्रसुखद कवायत येथे पहावयास मिळते. सध्या पाणीसाठा भरपूर असल्याने पाण्याची उथळ ठिकाणे कमी प्रमाणात आढळून येत आहेत.  

पाणी कमी झाल्यानंतर उथळ पाण्याचा बराचसा भाग पक्ष्यांसाठी उपलब्ध होईल. या उथळ भागातील मुबलक खाद्य मिळविण्यासाठी पक्ष्यांची सुरू असलेली धडपड कवायतीप्रमाणे दिसून येते. कुंभारगाव येथील पक्षिनिरीक्षक दत्ता नगरे, नितीन डोळे व अभिषेक लोंढे यांनी सांगितले की, यंदा प्रथमच करोता व काळशिर खंड्या हे पक्षी या जलाशयावर आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे बदकवर्गीय पक्ष्यांच्याही काही नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. करोता हा पक्षी पाणकोंबडा प्रजातीतील आहे. पाण्यातून बाहेर येऊन कोवळे ऊन घेताना हा पक्षी खूपच आकर्षक दिसतो. त्याचबरोबर काळशिर खंड्या हा पक्षीही सुंदर आहे. जलाशयालगतच्या दाट झाडीत त्याचे वास्तव्य आढळून आले. पर्यटकांच्या मागणीवरून जलाशयालगतच्या माळरानावर रात्रीची भटकंती केली जाते. यामध्ये माळावरील विविध प्रकारचे साप, पाल, विविध जातींची घुबड पाहावयास मिळते.

नोटाबंदीने पर्यटकसंख्या घटली 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीने आम्ही क्रांती फ्लेमिंगो पॉइंटची स्थापना केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना राहण्याची व पक्षी निरीक्षणासाठी बोटीतून फिरविण्याची सोय केली आहे. प्रत्येक हंगामात या ठिकाणी चाळीस हजारांहून अधिक पर्यटक भेट देत असतात. सध्या डिसेंबरमधील बुकिंग करण्यात आले आहे. मात्र, नोटाबंदीमुळे सध्या पर्यटकांची हव्या त्या प्रमाणात हजेरी लागत नाहीये, असे पक्षिनिरीक्षकांकडून सांगण्यात आले.

वाळूउपशाचा धसका

मध्यंतरी उजनीतील वाळूउपशाची घोषणा झाल्यानंतर येथील पक्षिप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वाळूउपशामुळे अनेक पक्ष्यांची उथळ पाण्याची ठिकाणे नष्ट होण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. या भागात वाळूउपसा झाल्यास पुढील काळात पक्षी विणीच्या हंगामासाठी येतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे, त्यामुळे येथील वाळूउपशास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.