Annapurna Scheme : ‘उज्ज्वला’सारखी योजना राज्यातही; मध्यम व छोट्या शेतकऱ्यांना मोफत वीज

महिला, युवक, शेतकरी या तीन घटकांना केंद्रस्थानी ठेवत अर्थसंकल्प मांडला जाऊ शकतो.
Vidhimandal Session
Vidhimandal Sessionsakal
Updated on

मुंबई - महिला, युवक, शेतकरी या तीन घटकांना केंद्रस्थानी ठेवत अर्थसंकल्प मांडला जाऊ शकतो. याबाबतची अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली असून, मध्यम व छोट्या शेतकऱ्यांना मोफत वीज, महिलांना मोफत इंधन आणि युवकांसाठी कौशल्यविकास योजना तयार करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.

गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या बैठकांत या तीन घटकांना दिलासा देणाऱ्या योजना कशा तयार करायच्या यावर बराच खल झाल्याचे समजते. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या मांडण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

युवकांच्या कौशल्याचा विकास व्हावा यासाठी ॲप्रेन्टिस योजना अर्थसंकल्पात समाविष्ट होऊ शकते. यानुसार १८ ते ३१ या वयोगटातील बारावी उत्तीर्ण मुलांनी विशेष कौशल्य मिळवावे यासाठी दरवर्षी पाच हजार रुपये तर पदवीधरांसाठी दरवर्षी आठ हजार रुपये अनुदान देण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्याचे खात्रीलायकपणे समजते. या वयोगटातील किती तरुण तरुणी लाभास पात्र होतील याचा तपास केला जातो आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २७) प्रसिद्ध केले होते.

केंद्र सरकारने चालू केलेल्या उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात अन्नपूर्णा योजना सुरू करायची शिफारस शिंदे यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात चार सिलिंडर मोफत देण्याचा प्रस्ताव पाठवला गेला आहे.

बळिराजाला आधार !

राज्यातील सुमारे दहा लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात यावेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी या योजनेचे सूतोवाच केले होते. ‘हर घर दीप’ असे या योजनेचे नाव असावे अशीही चर्चा होती.

या बरोबरच राज्यातील शेतीवर आलेले संकट सोडविण्यासाठी सुमारे ५० लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांनी ऊर्जा खाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याचे समजते. ऊर्जा खात्याच्या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मात्र ही योजना सरसकट सर्व शेतीपंपांना लागू न करता केवळ छोट्या शेतकऱ्यांना लागू करावी असे अर्थखात्यातील अधिकाऱ्यांना वाटते आहे. ‘माझी बहीण लाडकी’ या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.