Narayan Rane controversy : केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही तिखट प्रतिक्रिया दिल्या. नाशिक पोलिसांत दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून राणे यांना अटक करण्यात आली आहे. अडीच वाजण्याच्या सुमारास राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिस स्थानकात नेण्यात आलं आहे. राणे यांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. नारायण राणे यांनी महिनाभरापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मंगळवारी सकाळी नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी राणे यांना अटक करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली. नाशिक पोलिसांचं पथक रत्नागिरीकडे रवाना झालं. त्याचवेळी पुणे, महाड, औरंगाबादसह राज्यातील विविध शहरात तक्रारी आणि गुन्हा नोंदवण्यात आला. राज्यभर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. राणेंचा प्रतिकात्मक फोटो फाडत, चप्पल मारो आंदोलनेही झाली. पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. राज्यातील वातावरण ढवळून निघालं असतानाच दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी नारायण राणे यांची तब्येत खालावली होती. त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता. सरकारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांनी विरोध दर्शवला. कार्यकर्तेही संतापले होते. मात्र, पोलिसांनी राणे यांना अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांनी आपल्या वकिलामार्फत प्रयत्न केले होते. मात्र त्यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांना तूर्त कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संगमेश्वर जवळील गोळवली येथे नारायण राणे यांना अटक केली. पोलिस डायरीनुसार, 2 वाजून 25 मिनिटांनी राणे यांना ताब्यात घेतलं आहे. रायगड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार नारायण राणे यांना ताब्यात घेतलं. महाड येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी सुनिल पाटेकर यांनी तक्रार दिली होती. या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला अन् कारवाई करण्यात आली आहे. रायगड पोलिसांशिवाय पुणे आणि नाशिक पोलिसही रत्नागिरीला पोहचले आहेत. संगमेश्वर पोलिस स्थानकात राणे यांना ठेवण्यात आलं असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस कारवाईवर नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्याने रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला आणि याबाबत त्यांना माहिती दिली. राणे यांनी अटक वॉरंटची मागणी करण्यात आल्याचे अधीक्षकांनी परब यांना सांगितले. यावर अनिल परब म्हणाले की, ''सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलीस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा.'' त्यानंतर सूत्रे वेगाने हलली आणि राणे यांना अटक करण्यात आली. राणे यांना स्थानिक कोर्टात हजर केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचं वृत्त आहे.
राणेंच्या अटकेसाठी का निवडलं गोळवली
गोळवलीतील ज्या विकासप्रकल्पाच्या ठिकाणी नारायण राणे उपस्थित होते, तो परिसर मुख्य रस्त्यापासून एका किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. या गोळवलकर गुरुजी स्मृती विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी नारायण राणे याठिकाणी उपस्थित होते. हा परिसर मुख्य रस्त्यापासून बराच आत असल्यामुळे कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होणार नाहीत आणि गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. तसंच एकावेळी एकच गाडी आत येणं शक्य असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे पोलिसांनी ही संधी साधत नारायण राणेंच्या अटकेची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.
पोलिसांकडे अटक वॉरंट नाही - भाजप
राणे यांना अटक केल्यानंतर भाजपकडून राज्यातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांकडे कोणत्याही प्रकराचे अटक वॉरंट नसल्याचे आरोप भाजपने केला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यांवर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवाल भाजपने उपस्थित केला.
राणे यांच्या जिवाला धोका - प्रसाद लाड
नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राणे समर्थक संतापले आहेत. पोलिस आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. राणे पुत्रांनीही वडिलांच्या अटकेला विरोध केला. नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राणे यांच्या जिवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केली. याविरोधात भाजप कोर्टात जाणार असल्याची प्रसाद लाड यांनी सांगितलं.
वातावरण चिघळलं तर भाजप जबाबदार - राऊत
अटक करताना पोलिसांवर कोणताही दबाव नव्हता. पोलीस कायद्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यांनी कायद्याचं रक्षण केलं आहे. वातावरण चिघळण्याची शक्यता नाही. ज्यांनी जसं करावं तसं भरावं. वातावरण चिघळण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केलेली आहे. त्यांना अटक करण्याची आवश्यकता होती. वातावरण चिघळलं तर ती जबाबदारी भाजपाची असेल. असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
त्या वक्तव्यासाठी नारायण राणेंच्या पाठीशी भाजप नाही- फडणवीस
बोलण्याच्या भरात नारायण राणेंकडून वक्तव्य करण्यात आलं आहे. पण, एखादा मुख्यमंत्र्याबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यामुळे भाजप पक्ष अशा वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण, राज्य सरकारकडून जी कारवाई केली जात आहे, ती निषधार्ह आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राणे?
राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.