Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींची नावालाच 56 इंच छाती, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

पंतप्रधानांकडे खऱ्या विद्यापीठाची पदवी नसल्याने त्यांची जगभरात नाचक्की होत आहे.
Prakash Ambedkar vs Narendra Modi
Prakash Ambedkar vs Narendra Modiesakal
Updated on
Summary

'देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.'

सांगली : देशात लुटारूंचे सरकार आहे. महागाईच्या नावाखाली लुटायची पद्धत त्यांनी आणली आहे. या सरकारला पुन्हा सत्तेत आणायची गरज नाही. आम्ही आतापर्यंत सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला नाही; मात्र येत्या काळात सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही. सत्तेत परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध राहा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर वंचित बहुजन आघाडीची ‘सत्ता संपादन निर्धार सभा’ काल (बुधवार) झाली. सभेत अ‍ॅड. आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणूक दोन-तीन महिन्यांवर आली आहे. देशात काही घडू शकते. हे मलाच माहिती आहे, असे नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि गृह सचिवांनी पोलिसांना आदेश दिले आहेत की, सतर्क राहा, या देशात काही घडू शकते.

Prakash Ambedkar vs Narendra Modi
Maratha Reservation : भुजबळांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं, अन्यथा..; काय म्हणाले मंत्री विखे-पाटील?

भडकावणारे अनेकजण आहेत. हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी, आदिवासी-धनगर अशा दंगली होणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधारी भाजप व आरएसएसच्या राज्याचा हिशेब मांडायला सुरुवात केली पाहिजे. दहा वर्षांत सत्ता लोकांसाठी वापरली की लुटायसाठी, हे लक्षात घ्या. महागाई व तुटवडा निर्माण करून लुटीचा नवीन फंडा सुरू केला आहे. व्यापारी व सरकारने संगनमताने तुटवडा निर्माण करून टोमॅटोचा भाव वाढवला आणि देशात तब्बल ३५ हजार कोटींची लूट करून सरकारने निवडणूक फंड गोळा केला आहे.

Prakash Ambedkar vs Narendra Modi
Miraj Politics : काँग्रेसला धक्का देत सिद्धार्थ जाधवांचा ठाकरे गटात प्रवेश; 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

या लुटीतून कबाब, शबाब आणि महात्मा गांधी यांचा वापर करून पुन्हा सत्तेत येतील आणि देशाची लूट करतील. त्यांचा हा निवडणुकीचा फंडा आहे.’’ पंतप्रधानांकडे खऱ्या विद्यापीठाची पदवी नसल्याने त्यांची जगभरात नाचक्की होत आहे, असा आरोप करून ते म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी स्वत:च्या प्रेमात अडकले आहेत. अशी माणसे लोकशाहीसाठी धोकादायक असतात. नावालाच त्यांची ५६ इंच छाती आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये गेल्या दहा वर्षांत हजारांवर जवान शहीद झाले आहेत. तरीही ते पाकिस्तानवर हल्ला करण्याची हिम्मत दाखवत नाहीत.’’

धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे म्हणाले, ‘‘धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यासाठी आपला खासदार दिल्लीत जाणे महत्त्वाचे आहे.’’ राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ म्हणाले, ‘‘वंचित बहुजन आघाडी हा २४ कॅरेट धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. सर्व धर्मनिरपेक्ष मतदार एकत्र येण्यासाठी मुस्लिम बांधवांनी काम करावे.’’

दिशा पिंकीशेख यांनी देशात खासगीकरण सुरू आहे. जर खासगी कंपन्या आल्या, तर आरक्षणाचे लोणचे घालणार का, असा सवाल केला. राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले, ‘‘मंडल आयोगाला विरोध होत असताना भुजबळ कोठे होते? महाज्योतीला निधी मिळत नाही, त्याबद्दल भुजबळ बोलत नाहीत. ओबीसींना न्याय देण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.’’ युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, अमोल लांडगे, क्रांती सावंत, नितीन सोनवणे, सादिक शेख, महावीर कांबळे आदी उपस्थित होते.

Prakash Ambedkar vs Narendra Modi
High Court च्या आदेशामुळं उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा; 'ही' याचिका मागे घेण्याची परवानगी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दहा वर्षांत १४ लाख कुटुंबे परदेशात

देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. २०१४ ते २०२३ या काळात १४ लाख भारतीय कुटुंबे परदेशात गेले आहेत. १९५० ते २०१४ काळात सात हजार ६४४ कुटुंबानी भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले होते. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. त्यांच्या विचारांशी सहमत झालो नाही तर ईडी येईल आणि आपल्याला अटक होईल, अशी त्या लोकांची भावना आहे. त्यामुळे हिंदू लोक देश सोडत आहेत. हे पुन्हा सत्तेत आले तर हा आकडा एक कोटीवर जाईल, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

भर पावसात सभा

ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत असताना पावसाने हजेरी लावली. त्यातही त्यांनी काही काळ भाषण सुरू ठेवले. मोठ्या संख्येने जमलेले लोकही पावसात भाषण ऐकत राहिले. मात्र पावसाने जोर पकडल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी भाषण आटोपते घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.