'छत्रपती शिवरायांच्या भूमीत पुसेसावळीसारखी घटना घडेल, असा मला वाटत नव्हते.'
सातारा : देशात सध्या गोडसे, हेडगेवार, गोळवलकर विरुद्ध फुले, शाहू, आंबेडकर, गांधी अशा विचार प्रवाहात लढाई सुरू आहे. जनतेने या दोन्ही विचारांपैकी कोणत्या बाजूची पाठराखण करायची हे ठरवणे आवश्यक आहे. देशातील वातावरण निर्भय बनवायचे असेल, तर योग्य विचाराने मतदान करणे आवश्यक आहे. विचारांती मतदान केल्यास मोदींचा आगामी निवडणुकीत पराभव अटळ आहे. इंडिया आघाडीसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.
सातारा येथील गांधी मैदानावर संविधान जनजागृती विचारमंचच्या वतीने संविधान बचाव अभियानांतर्गत आयोजित सभेत ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) बोलत होते. यावेळी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, अभिनेते किरण माने, ॲड. अविनाश धायगुडे, अल्ताफ शिकलगार, सादिक शेख, जुनेद शेख, आरिफ खान, सादिक बागवान, बाळकृष्ण देसाई, सिद्धार्थ खरात, गणेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
समता सैनिक दलाने ॲड. आंबेडकर यांना मानवंदना दिली. ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या भूमीत पुसेसावळीसारखी घटना घडेल, असा मला वाटत नव्हते; पण ते घडले. त्यामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे. हा संघर्ष दोन विचारसरणींमधील आहे. सध्या देशात इतिहास, संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. जुना इतिहास नष्ट करून गोडसे, हेडगेवार, गोळवलकर यांच्या इतिहासाची मांडणी होत आहे.
जुन्या आणि नव्या इतिहासाच्या मुद्द्यांवर सर्वसामान्यांना भरकटवण्यात येत आहे. पराभवाच्या भीतीने निरंकुश सत्ताधीश सैरभैर झाला आहे. सत्तेसाठी त्याच्याकडून सर्व यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षाला चौदा महिने झाले; पण मविआला स्वत्त:चे राजकीय धोरण स्पष्टपणे ठरवणे अद्यापही शक्य झाले नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘भाजपचा पराभव करायचा असेल, तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत; पण आम्हाला सोबत घेतल्यास अडचण होईल, म्हणून सत्ताधीशांकडून आघाडीतील काही जणांवर दबाव आणण्यात येत असेल. विकासाच्या बातांवर जनमत सोबत येत नसल्याने आता धार्मिक मुद्दे पेटविण्यात येत आहेत. दिवाळीनंतर त्या प्रयत्नांना जास्त गती येईल. आपण सावध राहिले पाहिजे.
असे प्रकार करणारे आपल्या परिसरात दोन-चार असतील. त्यांचा बंदोबस्त पोलिस करणार नाहीत, कारण त्यांचे हात बांधलेत. त्यामुळे आपणच गावपातळीवर अशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. गावापुढे त्या दोन-चार जणांना टिकाव लागणार नाही, याची मला खात्री आहे. फाळणीवेळी पाकिस्तानला दिलेल्या निधीवरून गांधींवर आरोप करण्यात येत आहेत. त्याच कारणावरून त्यांचा गोडसेने खून केल्याचे भाजप, आरएसएस सांगत आहे. हे सत्य नाही.
दम असेल, तर आरएसएसचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी याविषयावर चर्चेसाठी माझ्यासोबत एका मंचावर यावे. आणा तो करार, त्यावर कोणाच्या सह्या होत्या, त्याला कोणी अनुमोदन दिले, त्याबाबत पाकिस्तानशी कोण चर्चा करत होते, यावर त्यांनी माझ्याशी बोलावे. पाकिस्तानला मदत केली म्हणून नव्हे, तर गांधींनी तिरंगा सर्वसामान्यांच्या हातात दिला, त्यांच्या हातात सत्ता दिली, या रागातून त्यांचा खून झाल्याचा दावाही ॲड. आंबेडकर यांनी या वेळी केला.
मुस्लिम समाजाने विचारपूर्वक मतदान केल्यास आगामी निवडणुकीत मोदींचा पराभव सहज शक्य आहे. मुस्लिम देखील चार पक्षात विभागलेत. त्यांनी त्या पक्षांत कार्यरत असणाऱ्या समाजबांधवांना निवडणुकीपुरते बाजूला करणे आवश्यक आहे. असे केले तर मतविभागणी टळून निवडणूक सोपी होईल. निवडणुकीवेळी ताकदीपेक्षा बुद्धीने खेळणे आवश्यक असल्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यानंतर रेखा ठाकूर, शेख सुभान अली, किशोर चव्हाण, ॲड. अरुण जाधव, आरिफ खान, बाळकृष्ण देसाई, इम्तियाज नदाफ यांची भाषणे झाली. पुसेसावळी प्रकरणाची सखोल चौकशी करत विनायक पावसकर, विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी भाषणात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.