वटपौर्णिमेचा सण सुवासिनींसाठी फार महत्त्वाचा सण असतो. या दिवशी सुवासिनी उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. या वर्षी काल म्हणजेच ३ जून रोजी हा सण पार पडला. सुवासिनींनी वडाच्या पूजेसाठी चांगलीच गर्दी केली होती.
वटपौर्णिमेचा दिवस मात्र चर्चेत आला ते म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांच्यामुळे. त्यांनी काल वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली आहे. महिला आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळाला, अशी प्रार्थना करत वडाची पूजा करतात. पण निलेश यांनी आपल्याला हीच पत्नी मिळावी म्हणून पूजा केली आहे.
निलेश चाकणकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. त्यांनी आपल्या घरात वडाची पूजा केली आहे. त्यांनी वडाची पूजा करून धागाही बांधला आहे. त्यांच्या या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कशासाठी करतात वडाची पूजा?
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीसाठी वडाची पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य मिळावं, तसंच हाच पती जन्मोजन्मी मिळावा, म्हणून ही पूजा केली जाते. यामध्ये वडाच्या झाडाची ओटी भरली जाते, त्याची पूजा केली जाते. तसंच कापसाचा धागा वडाभोवती गुंडाळला जातो, वडाला फेऱ्या मारल्या जातात.
लग्नानंतर मी कधीही वड पूजला नाही - रुपाली चाकणकर
वटपौर्णिमेबद्दल यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी वडाच्या झाडाला दोरे बांधून, फेऱ्या मारत नाही. किंवा मी वडाच्या झाडाची फांदी तोडून कधी वटपौर्णिमा साजरी करत नाही. लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही, असं विधान रुपाली चाकणकर यांनी एका कार्यक्रमात केलं होतं.
त्या पुढे म्हणाल्या होत्या की, मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाची पूजा केली नाही. पण पूजा करणाऱ्यांच्या भावना, भूमिका मी समजू शकते. मला वड पूजण्यापेक्षा वडाचे, वृक्षांचे संवर्धन करणं अधिक योग्य वाटतं. काय योग्य, काय अयोग्य याचा विचार ज्याचा त्याने करावा आणि तशी कृती करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.