पिंपरी : इंटरनेटच्या मायाजालातून मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये नवे-नवे गेम डाऊनलोड होऊ लागले आहेत. चीन, जपान, तैवानमधील आणि देशातील अनेक कंपन्यांनी विद्यार्थी आणि तरुणांना विविध गेमचे पर्याय दिले. परिणामी शहरात ऑनलाइन स्टडीपेक्षा गेम खेळण्याचे व्यसन वाढले आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासू लागली आहे.
लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना व्हीडिओ गेमचे व्यसन लागले आहे. ऑनलाइन क्लासच्या नावाखाली दुसरीकडे ‘स्क्रीन’वर गेम खेळले जातात. एक हजार पायऱ्या पूर्ण केल्यावर ‘डिजिटल मनी’ मिळत असल्याने सगळीकडे हातात मोबाईल घेऊन वावरणारे विद्यार्थी, युवक दिसत आहेत. यातील काही गेम ‘थ्रीडी’असल्यामुळे जणू काही समोर हायवे रेस सुरू असल्याचा भास होतो. मुलांना नकळत त्याचे व्यसन लागत आहे. सध्या शहरात एकेका व्यसनमुक्ती केंद्रात महिन्याकाठी दोन ते पाच केस दाखल होत आहेत. या केंद्रात पेशंट दाखल करण्याची वेळ पालकांवर आली आहे.
गेममध्ये तीन तास गुंतून
फोरजीने जनमानसात क्रांती केली. त्यातूनच मोबाईल, कॉम्प्युटर गेमचा बाजार ऑनलाइन भरविला जात आहे. परिणामी, नवे-नवे गेम डाऊनलोड होऊ लागले. किमान तीन तास आणि कमाल १२ तास हे गेम एक-एक पायरी जिंकण्यासाठी किंवा स्कोअर करण्यासाठी खेळले जातात.
नवीन विविध गेमचे पर्याय
सुरवातीला पब्जी, ब्लू व्हेलने हजारो विद्यार्थी युवकांना वेड लावले. ब्लुव्हेलमुळे अनेकांनी प्राण गमावले. पब्जी, कल्याश ऑफ कल्यान्स, कल्याश रॉयल, फ्री फायर, कॅण्डी क्रश, कार रेस, लुडो, सोडासागा, कॉल ऑफ ड्यूटी, इटीएसवडल्यू, जिटीए, ईटीएस टू हे गेम सध्या शहरात खेळले जात आहेत. मित्रांच्या साखळीमध्ये ‘मल्टी लेअर’ असलेल्या या गेम मध्ये ‘मल्टी पार्टनर’ घेऊन टीमच्या टीम सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मोबाईलवर गुंतलेली पाहायला मिळते.
पालक म्हणतात
सुनील चव्हाण (कृष्णानगर,चिंचवड) ः ‘‘मुलांना गेमिंगचा नाद लागला आहे. कँडी क्रश सारखे गेम अनलिमिटेड पायऱ्यांचे आहेत. मुले थांबत नाहीत. सरकारने चीन सरकारप्रमाणे गेमिंग कंपन्यांवर वेळेचे बंधन टाकावे.’’
सोनाली मन्हास (रुपीनगर) ः ‘‘ऑनलाइन आणि ऑफलाईन गेम आहेत. क्लासेस सुरू असताना विद्यार्थी गेम खेळतात. गेम खेळताना मुले क्लासेसचा ‘स्क्रीन म्युट’ करून ठेवतात. मुलांमध्ये चिडचिड, तापटपणा वाढला आहे.’’
दीपा जगताप (शिक्षिका,चिखली प्राधिकरण) ः ‘‘क्रीडांगणे, शाळा, विद्यालये बंद आहेत. टीव्हीचे कार्यक्रम मुलांना आवडत नाहीत. आता सरकारने एक दिवस आड तरी शाळा सुरू कराव्यात. मुलांना शिक्षणासाठी सरकारने सुंदर कार्यक्रमाचा विद्यार्थी चॅनल सुरू करावा.’’
‘‘मुले अभ्यास करत आहेत, असा भाबडा विश्वास ठेवून पालक सुरुवातीला दुर्लक्ष करतात. नंतर पाल्याच्या सवयी वेगळ्या आणि विचित्र वाटल्यामुळे आता सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओ गेमचे व्यसन कधी लागते, हे त्यांनाच कळतच नाही. अशा वेळी पॅनिक अटॅक देखील येऊ शकतो. त्यांना मोबाईलशिवाय काहीही सुचत नाही. त्यामुळे मुले आक्रमक होऊन तोडफोड करू लागतात, अशा मुलांना उपचारांसाठी दाखल करून घ्यावे लागते.’’
-डॉ. योगेश पोकळे, मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.