Vidhan Parishad Election : काँग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच अधिक धोका! प्रज्ञा सातव यांच्यावर टांगती तलवार?

विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार करणार नाही, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत असला तरी घोडेबाजाराशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
Pradnya Rajeev Satav
Pradnya Rajeev Satavesakal
Updated on

- विजय चोरमारे

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही घोडेबाजार करणार नाही, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत असला तरी घोडेबाजाराशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. त्यामध्ये कोणत्या उमेदवाराला अधिक धोका आहे, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यात येत आहेत.

जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अधिक धोका, याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनाच अधिक धोका असल्याचे मानले जाते.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून त्यात महायुतीच्या ९ आणि महाविकास आघाडीच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पाच वर्षांची मुदत पूर्ण होत आली असून, मधील काळात बऱ्याच घडामोडी घडल्या.

त्यामध्ये विधानसभेचे संख्याबळ २८८ वरून २७६ वर आले आहे. २०१९मध्ये काँग्रेसचे ४४ उमेदवार निवडून आले होते. मात्र, सदस्यांचे निधन, पक्षांतर, चार सदस्य लोकसभेवर निवडून येणे, आदींमुळे साडेचार वर्षांपूर्वी ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ ३७ वर आले आहे.

विधान परिषदेला एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २३ मतांची आवश्यकता आहे. त्यादृष्टिकोनातून पाहिले तर एकच जागा लढविणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव या सर्वाधिक सुरक्षित दिसून येतात. परंतु हीच सुरक्षिततेची भावना काँग्रेसवाल्यांना नेहमीप्रमाणे गाफील ठेवून दगाफटका होऊ शकतो.

काँग्रेसकडे प्रत्यक्षात ३७ आमदारांचा आकडा असला तरी त्यापैकी इगतपुरीचे हिरामण खोसकर, अमरावतीच्या सुलभा खोडके आणि वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी या तीन आमदारांचा वावर जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. त्याशिवाय भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक तीन ते चार आमदार असून त्यांची मते महायुतीला मिळाली पाहिजेत, अशी तंबी त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आली आहे.

अशा रीतीने काँग्रेसचे संख्याबळ ३० वर येते. यातील किती मते काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यासाठी निश्चित केली जातात, आणि किती मविआच्या अन्य उमेदवारांना देण्याचे निश्चित केली जातात, हे पाहावे लागेल. घोडेबाजार होणार असल्यामुळे आणि जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर या स्पर्धक उमेदवारांची आर्थिक ताकद मोठी आहे.

मते फुटण्याची चिंता

या निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्यामुळे कारवाईचा थेट धोकाही संभवत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची मतेच अधिक प्रमाणात फुटली होती. त्यामुळे डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यासाठी निश्चित केली जाणारी मते फुटणार नाहीत, याची काळजी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे.

सर्वाधिक सुरक्षितच, सर्वांत असुरक्षित

प्रज्ञा सातव या थेट काँग्रेस हायकमांडच्या उमेदवार असल्यामुळे राज्यातील नेत्यांची थोडी हलगर्जीही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या उमेदवाराची विकेट काढून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्याचा प्रयत्न राहील. मात्र भाजपकडून थेट काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारालाच सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com